जलतरण तलावावरून सेना भाजपा आमनेसामने


मुंबई - चेंबूरमधील महापालिकेच्या जनरल अरुणकुमार वैद्य तलावाच्या उद्घाटनावरून भाजपा श्रेय घेत असल्याची स्थानिक रहिवाशांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असताना, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही यावरून राजकीय 'सूर' मारला. नागरिकांसाठी खुल्या केलेल्या तलावाचे उद्घाटन कसे करणार, असा टोला लगावून या तलावाची पाहणी करण्यासाठी आपण आलो आहोत, असे ठाकरे म्हणाले.

चेंबूरच्या एम वॉर्ड कार्यालयाच्या बाजूला पालिकेने १९९१-९२ मध्ये हा तलाव बांधल्यावर त्याचा स्थानिकांकडून चांगला वापर होत असे; पण देखभाल आणि दुर्लक्षामुळे तलावाची दुरवस्था झाली. अखेर हा तलाव २००७ पासून पोहण्यासाठी बंद केला. यावर स्थानिकांनी आंदोलन केल्यावर स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी निधी उपलब्ध करून दिला. प्रभाग समितीचे तत्कालीन अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर १८ मार्च २०१५ पासून ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव बांधण्यास सुरुवात झाली. हे काम साडेतीन वर्षांनी संपले. काम संपूर्ण झाल्याने १८ ऑगस्ट रोजी उद्घाटन होणार होते; परंतु माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे पालिकेने जलतरण तलावाचे उद्घाटन न करताच नागरिकांसाठी खुला केला. सोमवारी ठाकरे यांनी महापौरांसमवेत तलावाच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन केले होते; पण भाजपाचे स्थानिक नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासोबत तलाव बांधण्याचे श्रेय घेण्याकरिता सकाळी १० वाजता उद्घाटन आयोजिले होते. या वेळी ठाकरे यांनी तलावाची पाहणी करून भाजपावर कडी करण्याची संधी साधली. 'खुल्या केलेल्या तलावाचे उद्घाटन काय करणार? ज्यांना येथे येऊन पोहायचे आहे त्यांना पोहू दे, मी राजकारणात जाणार नाही. मी राजकीय पाण्यात उडी मारणार नाही. कारण तेथे चिखल असतो. मी फक्त या पुलाची पाहणी करण्यासाठी आलो,' असे आदित्य ठाकरे म्हणाले. या वेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, प्रकाश फातर्पेकर, नगरसेविका अंजली नाईक, समृद्धी काते, समीक्षा सक्रे, माजी नगरसेविका सुप्रदा फातर्पेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

शिवसेनेला नमते घ्यावे लागले - मराठे.
तो पाहणी दौरा नव्हता. स्थानिक नगरसेविकेला डावलून श्रेय लाटण्याचा शिवसेनाचा प्रयत्न होता. पण भाजपानेही उद्घाटनाचे आयोजन केल्याने शिवसेनेला नमते घ्यावे लागले, असा दावा स्थानिक नगरसेविका आशा मराठे यांनी केला.

फलकांवर उद्घाटनाचा उल्लेख नव्हता - फातर्पेकर
या जलतरण तलावाचे उद्घाटन आधीच झाले होते. ठाकरे त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. या परिसरात भगवे झेंडे, फुगे व फलक लावले होते. त्यावर उद्घाटनाचा उल्लेख नव्हता, असे सुप्रदा फातर्पेकर म्हणाल्या. शिवसेना श्रेयवादाची लढाई लढत नसून, महापौर म्हणून तलावाच्या पाहणीसाठी गेलो होतो. या वेळी नगरसेविका आशा मराठे यांनी यायला हवे होते; पण त्या आल्या नाहीत, असे महापौर म्हणाले.
Tags