Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

बिल्डर, अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा - विखे पाटील


मुंबई - क्रिस्टल टॉवर आगप्रकरणी संबंधित बिल्डरसह दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि महापालिका आयुक्रत अजोय मेहता यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील सर्व बहुमजली इमारतींना मिळालेले परवाने व इतर संरक्षणात्मक उपाययोजनांबाबत आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांकडून स्वतंत्र तपासणी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

विखे पाटील यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. क्रिस्टल टॉवर या बहुमजली इमारतीला आग लागून ४ जणांचा मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या इमारतीसाठी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त होण्यापूर्वीच त्याठिकाणी अनेक कुटुंबांचे वास्तव्य सुरू झाल्याचे तसेच इमारतीमध्ये सक्षम अग्निशमन यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे. ही वस्तुस्थिती असेल, तर ही बाब अतिशय गंभीर आहे. मुंबई महापालिकेमध्ये बांधकाम व्यावसायिक, प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या संगनमताने भ्रष्ट व्यवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळेच मुंबई शहरात वारंवार अशा गंभीर घटना घडत आहेत. हे तीनही घटक या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत असून निरपराध मुंबईकरांना आपले प्राण गमावून त्याची किंमत चुकवावी लागते आहे. मुंबई महापालिकेचा प्रशासकीय कारभार योग्य पद्धतीने व नियमानुसार चालवण्यासाठी जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी आयुक्त व इतर सनदी अधिकारी नेमण्यात आले आहेत; परंतु खुद्द महानगरपालिका आयुक्तच गैरकारभाराला खुले संरक्षण देत असल्याने मुंबईतील परिस्थिती अधिकाधिक गंभीर होत असल्याचा ठपका राधाकृष्ण विखे पाटील यांनी या पत्राच्या माध्यमातून ठेवला आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom