रुग्णांसाठी धर्मशाळा बांधण्याकरिता भूखंड उपलब्ध करा


मुंबई - विविध आजारांनी त्रस्त असलेल्या व महाराष्ट्रासह देशभरातून उपचारासाठी मुंबईत येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधण्यासाठी दादर, परेल, शिवडी घाटकोपर आदी ठिकाणी भूखंड उपलब्ध करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी सुधार समितीपुढे ठेवला आहे.

कर्करोग, हृदयरोग, किडनीचे आजार आदी दुर्धर व्याधींनी त्रस्त झालेले रुग्ण देशभरातून आणि परदेशातूनही मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी येतात; परंतु मुंबईत सध्या फक्त धर्मशाळा आहेत. टाटा मेमोरियल कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकरिता धर्मशाळांत अत्यल्प दरात निवास आणि मोफत भोजन व्यवस्था मिळते. पण गरीब रुग्णांच्या वाढत्या संख्येपुढे या धर्मशाळांमधील जागा अपुऱ्या पडत आहे. त्यांच्यासोबत येणाऱ्या नातेवाईकांचीसुद्धा गैरसोय होते. हे लक्षात घेता मुंबईत बाहेरगावावरून उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी दादासाहेब फाळके मार्ग किंवा दादर, परळ, वडाळा, माटुंगा, शिवडी, घाटकोपर येथे आरक्षित असलेले भूखंड धर्मशाळा बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दादर येथील गाडगे महाराज मिशन धर्मशाळा ट्रस्टचे व्यवस्थापक प्रशांत देशमुख यांनी एल विभागाकडे पत्राद्वारे केली होती. एल प्रभाग समितीने याला मंजुरी दिल्यानंतर एल प्रभाग समिती अध्यक्ष किरण लांडगे यांनी हे पत्र सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्याकडे पाठवले आहे. मंगळवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
Tags