जेईई व नीट परिक्षेकरता विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण


नवी दिल्ली - एमबीबीएस व निमवैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणारी 'राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा' अर्थात 'नीट' आणि अभियांत्रिकीसाठीच्या जेईई या परिक्षेकरता विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील वर्षीपासून हा नियम अमलात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे 'नीट'सह विविध स्पर्धा परीक्षांसाठी खासगी शिकवणी घेणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

नीट, जेईईसह मॅनजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची सीमॅट, अधिव्याख्याता पदासाठीची यूजीसी नेट आणि फार्मसीसाठीची जीपॅट या परीक्षांचे आयोजन 'सीबीएसई'ऐवजी आता 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' अर्थात 'एनटीए'द्वारे केले जाणार आहे. एनटीएने वरील परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण देण्याचा विडा उचलला आहे. याकरता देशभरात २६९७ केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. भविष्यात या केंद्रांचे प्रशिक्षण केंद्रात रूपांतर केले जाणार आहे. येत्या ८ सप्टेंबरपासून केंद्र सुरू होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे. नीट व जेईई परीक्षेसाठी देशाच्या कोनाकोपऱ्यात खासगी क्लासेस सुरू आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शुल्क घेऊन प्रशिक्षण दिले जाते. पण आता सरकारने मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या खासगी क्लासेसला चांगलाच दणका बसणार आहे.
Tags