महापौर शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रियेत बदल करावा - मंगेश सातमकर


मुंबई - मुंबई महापौर शिक्षक पुरस्काराच्या उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत चूक नक्कीच झाली आहे, अशी स्पष्ट कबुली शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी समितीच्या सभेत देताना, पुढील वर्षापासून उमेदवार निवडताना महापालिका 'झोन'निहाय 'कोटा' तयार करून, शिक्षकांना त्यांची कागदपत्रे निवड समितीसमोर सादर करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी आणि उमेदवार निवडीसाठी हवे, तर वृत्तपत्रांत जाहिरात देण्यात येईल. मात्र, उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत बदल हा करावाच लागेल, असेही त्यांनी सांगितले.

महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गुणवंत ५० शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्कार नुकतेच जाहीर केले. मात्र, यामध्ये उर्दू शाळेतील शिक्षकांसाठी सहाचा कोटा असताना केवळ तीनच शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याने उर्वरित उर्दू शिक्षकांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ही गंभीर बाब असून, या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या शिक्षण विभागातील झारीतील शुक्राचार्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी सोमवारी शिक्षण समितीमध्ये केली आहे. मराठी, हिंदी माध्यमाप्रमाणेच उर्दू माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांसाठी सहाचा कोटा आहे; पण पुरस्कारासाठी उमेदवार निवडताना शिक्षण विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे उर्दू शाळेतील फक्त ३ शिक्षकांनाच हा पुरस्कार जाहीर केला, असा आरोप त्यांनी केला. यासंबंधी अनेक उर्दू शाळांमध्ये माहिती दिली नाही व काही ठिकाणी अखेरच्या क्षणी माहिती दिल्याने एकूण शिक्षकांपैकी केवळ ७ अर्ज सादर झाले आणि ३ शिक्षकांचीच निवड केली. या प्रकरणी चौकशी करावी आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षकांना कोट्याप्रमाणे पुरस्कार द्यावेत, असे त्या म्हणाल्या. माजी महापौर आणि शिवसेना नगरसेविका स्नेहल आंबेकर, काँग्रेसचे प्रजापती यादव, शिवसेनेच्या शीतल म्हात्रे, शुभदा गुढेकर, साईनाथ दुर्गे, भाजपाच्या आरती पुगावकर आणि स्नेहल शहा यांनीही प्रशासनावर यावरून जोरदार टीका केली. हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्काराचा पाया असल्यामुळे त्याचा दर्जा टिकवला पाहिजे, असे आंबेकर म्हणाल्या. जास्तीत जास्त शिक्षकांना या उपक्रमात सहभागी केले पाहिजे, अशी सूचना पुगावकर यांनी केली, तर पालिकेच्या प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना यात सहभागी करून या उपक्रमाचा दर्जा कसा वाढेल, याकडे शिक्षण विभागाने आणि निवड समितीने गंभीरपणे विचार करावा, असे यादव म्हणाले.
Tags