पहिल्याच ३ आठवड्यात जगभरातील ४१ देशांतुन ४०० लघुपट सहभागी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 August 2018

पहिल्याच ३ आठवड्यात जगभरातील ४१ देशांतुन ४०० लघुपट सहभागी

मुंबई / प्रतिनिधी : मुंबईच्या जुहू किनाऱ्याजवळील मालिनी किशोर संघवी शांतीप्रभा प्रेक्षागृहात येत्या १९ ते २१ ऑक्टोबर रोजी ‘६ वा माय मुंबई आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ साजरा होणार आहे. 'युनिव्हर्सल मराठी' आणि 'रितंभरा विश्व विद्यापीठाचे मालिनी किशोर संघवी कॉलेज' यांच्या संयुक्त विद्यमानाने होणा-या या महोत्सवात जगभरातील लघुपटकारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. ह्या महोत्सवाच्या स्पर्धक प्रवेशिकेसाठी पहिल्याच ३ आठवड्यात जगभरातील ४१ देशांतुन ४०० लघुपट सहभागी झाले आहेत. या तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. महोत्सवाचे हे सहावे वर्ष असून यामध्ये लघुपटकारांसाठी पॅनल डिस्कशन, ऍडोब वर्कशॉप, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चित्रपटसृष्टीतले तज्ञ, प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी चर्चा आणि प्रश्नोतरे यासारख्या कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. 

महोत्सवातील स्पर्धक प्रवेशकेसाठी आतापर्यंत भारत देशाव्यतिरिक्त जगाच्या ५ उपखंडातील ४० देशांतून प्रवेशिका आल्या आहेत. मुंबई च्या क्षेत्रफळाएवढ्या चिमुकल्या देशांपासून ते भारताच्या सहापट मोठ्या असलेल्या महाकाय देशांतून स्पर्धक प्रवेशिका सहभागी झाल्या आहेत. त्यात पोर्तुगाल, इजिप्त, अर्जेन्टिना, युएसए, बॉस्निया अँड हर्जेगोविना, फ्रान्स, रशियन फेडेरेशन, चिली, इराण, उरुग्वे, ग्रीस, उझबेकिस्तान, बांगलादेश, अल्गेरिया, रोमेनिया, मलेशिया, इटली, युगांडा, स्पेन, ब्राझील, मेक्सिको, कोलंबिया, स्वित्झर्लंड, पेरू, जर्मनी, युनाइटेड किंग्डम, मोरक्को, साऊथ कोरिया, डेन्मार्क, रशिया, पॅलेस्टीने, नेपाळ, स्वीडन, स्लोव्हेनिया, चीन, कोस्टा रिका, पोलंड, कॅनडा, प्युएर्टो रिको ह्या देशांचा समावेश आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म्स या वर्गवारीत लघुपटकारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. हा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर होणा-या या महोत्सवासाठी लघुपटकारांकडून विनामूल्य प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. या महोत्सवासाठी लघुपटांच्या विविध वर्गवारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सामाजिक जनजागृती शॉर्ट फिल्म (सोशल अवेरनेस), आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म (विदेशी फिल्म), अॅनिमेशनपट, कल्पनारम्य (फिक्शन) फिल्म, जाहिरातपट (अॅडफिल्म), संगीतपट (म्युझिक व्हिडियो) आणि माहितीपट (डॉक्युमेंटरी) अशा या सात वर्गवारीकरिता विनामूल्य ऑनलाईन प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१८ आहे.

ह्या फेस्टिवलच्या आयोजनात युनिव्हर्सल मराठी टीमसोबत मालिनी किशोर संघवी कॉलेजातील बीएमएम विभागाचा फिल्म क्लब सक्रिय भूमिका बजावत आहे. युनिव्हर्सल मराठीच्या लघुपट चळवळीला लोकल ते ग्लोबल मिळणारा प्रतिसाद हे ह्या फेस्टिवल चे खास वैशिष्ट्य आहे. संकल्पनारचनावादी ठरलेल्या ह्या महोत्सवामध्ये चित्रपट सृष्टीतल्या मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभणार असून लघुपटकारांना विविध विषयांवर चर्चा आणि प्रश्नोत्तरांची संधी मिळणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या लघुपटांचे परीक्षण या क्षेत्रातील तज्ञांकडून केले जाईल. तीन दिवसीय असलेल्या या महोत्सवात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग केले जाईल. प्रत्येक लघुपट वर्गवारीतून प्रत्येकी एक ‘बेस्ट शॉर्टफिल्म’ विजेता आणि सर्वोत्तम कामगिरी करणा-याना वैयक्तिक तांत्रिक अॅवॉर्ड (टेक्निकल अॅवॉर्ड) देऊन गौरविण्यात येईल. लघुपट वर्गवारीतील विजेत्यांना रोख रकमेसहित आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात येईल. महोत्सवाच्या www.mmisff.com ह्या वेबसाईटवर किंवा https://filmfreeway.com/mymumbaiinternationalshirtfilmfestival ह्या वेबसाईटवर नाव नोंदवून महोत्सवात विनामूल्य प्रवेश घेता येईल. फेस्टिवलच्या अधिक माहितीसाठी ९७६८९३०८५३ / ९९६९४१२४२६ / ९८१९५३०५६९ या क्रमांकावर तसेच ‘युनिव्हर्सल मराठी’च्या फेसबुकह पेजवर संपर्क साधता येईल.

Post Bottom Ad