६० कोटींचे ३९ प्रस्ताव ५ मिनिटांत मंजूर


मुंबई - स्थायी समितीची सभा बुधवारी अवघ्या ५ मिनिटांत आटोपती घेण्यात आली. या सभेत ६० कोटी रुपयांच्या ३९ प्रस्तावांना संमती देण्यात आली. २९ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमपत्रिकेत विविध नागरी कामांचे ३५ प्रस्ताव प्रशासनाने संमतीसाठी मांडले होते तर १, ८, १४ आणि २० ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमपत्रिकेतही असलेले प्रत्येकी १ प्रस्ताव समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आधीच्या सभांमध्ये निर्णयाविना राखून ठेवले होते. त्यांनाही सदस्यांनी मंजुरी दिली. दुपारी २ ऐवजी २.१६ वाजता सुरू झालेल्या सभेचे कामकाज २.२१ वाजता संपले.

या ३९ प्रस्तावांमध्ये अतिरिक्त आयुक्तांच्या रजांना मंजुरी, अग्निशमन दलातील जम्बो टँकर्सकरीता स्टिअरिंग वर्किंग सिलिंडर खरेदी करणे, विविध वॉर्डांमधील घनकचरा जमा करून तो वाहून नेण्यासाठी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याकरीता केलेल्या कंत्राटात फेरफार करणे, भांडुप संकूल येथील बिनतारी संच व उपसाधनांचा पुरवठा आणि उभारणी, चाचणी व कार्यान्वित करणे, विविध ठिकाणच्या परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्याकरीता विविध व्यासांच्या जलवाहिन्या पुरवणे, टाकणे, बदलणे, मुंबईतील सर्व तलाव व नद्यांमध्ये विसर्गद्वार उभारणे, झोपडपट्टीमध्ये पाणीपुरवठा करणे, मुंबईतील विविध विभागांत खाजगी सुरक्षा संस्थांची नियुक्ती करणे आदी प्रस्ताव होते. या आठवड्याच्या प्रस्तावांमधील ९,२२,२८,२९ आणि ३० क्रमांकांच्या प्रस्तावांवर अध्यक्षांनी निर्णय न घेता ते राखून ठेवले आहेत. परिमंडळ ३ मधील डेब्रिज गोळा करून ते वाहून नेण्याकरीता वाहने व यंत्रसामग्री भाड्याने घेणे, एन/एस आणि टी विभागांतील घनकचरा जमा करून तो वाहून नेण्यासाठी गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याकरीता केलेल्या कंत्राटात फेरफार करणे, के/ पश्चिम व पूर्व, एच पूर्व आणि पश्चिम आणि पी/दक्षिण व पी/उत्तर विभागातील विविध ठिकाणच्या परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करणे या प्रस्तावांवर समितीने निर्णय न घेता प्रस्ताव राखून ठेवले.

समितीचे अध्यक्ष जाधव तापाने फणफणले असून, सध्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. पण स्थायी समितीची सभा असल्यामुळे त्यांनी डॉक्टरांकडून अनुमती घेऊन समितीचे कामकाज ५ मिनिटांमध्ये आटोपले आणि पुन्हा रुग्णालयात दाखल झाले. आजच्या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, असिफ झकेरिया, काँग्रेस नगरसेविका आणि शिवसेना, भाजपाचे काही नगरसेवक उपस्थित होते. मात्र विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपाचे गटनेते मनोज कोटक, प्रभाकर शिंदे आणि समाजवादी पक्षाचे गटनेते या सभेला उपस्थित नव्हते. भाजपाचे सदस्य मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत एका बैठकीत व्यस्त होते.
Tags