अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन, सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा


नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानिमित्त केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या सात दिवसात होणारे सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात आज सायंकाळी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. उद्या शुक्रवारी त्यांचं पार्थिव ६ ते ९ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत भाजप मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. दुपारी एक नंतर अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असं वाजपेयींचं अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. एक छोटा राजकीय कार्यकर्ता ते पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. ते आयुष्यभर अविवाहित राहिले. जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८ ते १९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५ ते १९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७ ते १९८०), भाजपचे अध्यक्ष (१९८० ते १९८६) आणि भाजप संसदीय पक्षाचे नेते (१९८० ते १९८४, १९८६, १९९३ ते १९९६), ११व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच, २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री ही पदे त्यांनी भूषविली.
Previous Post Next Post