
नवी दिल्ली - विविध प्रकारच्या संकटग्रस्त बालकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या चाईल्ड लाईन हेल्पलाईनला गत ३ वर्षांत ३.४ कोटी कॉल करण्यात आले असून, यापैकी एक तृतीयांश कॉलवर पलीकडून कसलाही आवाज आला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संकटग्रस्त बालके चाईल्ड लाईनला संपर्क करतात, मात्र अनेकदा आपल्या अडचणी सांगण्याचे धैर्य त्यांना होत नसल्याचा अंदाज यावरून बांधला जात आहे.
चाईल्ड लाईन फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार २०१५ पासून चाईल्ड लाईन हेल्प लाईनला एकूण ३.४ कोटी कॉल करण्यात आले. मात्र, यापैकी एक तृतीयांश कॉलवर पलीकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. अशा कॉलमध्ये मागील आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. मात्र, संपर्क करणारा व्यक्ती गप्प राहत होता. मदतीसाठी हे कॉल करण्यात आले असावे, मात्र बोलण्याचे धैर्य संबंधित बालकाला होत नसावे, असा अंदाज चाईल्ड लाईनसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अशा कॉलमधून संकटाचे संकेतही मिळतात. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात ४५० बाल संपर्क केंद्र आहेत. येथे सुमारे ६.६ लाख तक्रारी दाखल होतात. २०१७-१८ मध्ये चाईल्ड लाईनच्या माध्यमातून गैरवर्तणुकीच्या ८० हजारहून अधिक तक्रारी मिळाल्या व ३१ हजार कॉलमधून बेपत्ता बालकांविषयीची माहिती मिळाली. २०१७-१८ (३० जूनपर्यंत) चाईल्ड लाईनला १.४ कोटी कॉल करण्यात आले. म्हणजेच दर महिन्याला सुमारे १० लाख कॉल या हेल्प लाईनवर येतात. कार्यकर्त्यांच्या सांगण्यानुसार भारतात मानव तस्करी पीडितांची संख्या १.७ कोटी, तर जगात ४.०३ कोटी इतकी आहे..