समुद्रात ४ मुले बुडाली, एक अद्याप बेपत्ता


मुंबई - वर्सोवा येथील समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या ४ मुलांपैकी ३ जणांना स्थानिकांनी वाचवले असून त्यातील एकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. 

अंधेरी (प.), वर्सोवा, पाटील गल्ली, वर्सोवा बंदर रोड, वर्सोवा समुद्र, पोलीस ठाण्याजवळील समुद्रात सोमवारी ३.३०च्या दरम्यान याच परिसरात राहणारे आयुष खंडू रइदर (१३), हर्ष अमोल कोळी (१२), रेहान अब्बास अन्सारी (१३), वैभव राकेश गौड (१३) ही ४ मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली. दरम्यान, समुद्राला अचानक भरती आल्याने ती मुले पाण्यात बुडू लागली. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी मदतकार्य सुरू करून तीन मुलांना समुद्रातून बाहेर काढले. त्यापैकी रेहान अन्सारी (१३)ची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, तर वैभव गौड हा मुलगा बेपत्ता असून अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक मच्छीमार, सागरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वर्सोवा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Tags