लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदी संजय बर्वे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2018

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रमुखपदी संजय बर्वे

मुंबई - गेली दोन वर्ष रिक्त असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालक पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार संजय बर्वे यांची मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. बर्वे यांचे नाव मुंबई पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत होते, मात्र आयुक्त पदावर सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती झाल्यानंतर नाराज झालेल्या बर्वे यांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाच्या लाचलुचपत विभागाच्या प्रमुखपदावर करण्यात आली. बर्वे यांना जवळ जवळ नऊ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

वादग्रस्त आदर्श सोसायटीत बर्वे यांच्या नावावर सदनिका असल्याने ते काहीसे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. यामुळेच त्यांची नियुक्ती महत्त्वाच्या पदावर केली जात नव्हती. बर्वे यांचे वडील आरएसएसचे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यामुळेच बर्वे यांची लाचलुचपत विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्ती झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. लाचलुचपत विभागात सध्या राज्यातील गाजलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याची प्रकरणे तपासासाठी आहेत. या घोटाळ्यात राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार, सुनील तटकरे आदी नेत्यांची नावे असल्यामुळे या विभागाच्या प्रमुखपदावर आपल्या विश्वासातील अधिकारी मिळत नसल्यामुळे या विभागाच्या प्रमुखपदावरून प्रवीण दीक्षित निवृत्त झाल्यावर गेली दोन वर्षे हे पद रिक्त ठेवण्यात आले होते. विवेक फणसाळकर हे लाचलुचपत विभागाचे अतिरिक्त महासंचालक होते. त्यांच्याकडे या विभागाच्या प्रमुखपदाचा अतिरिक्त भार होता. पण फणसाळकर यांची अलीकडेच ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती झाल्यामुळे लाचलुचपत विभागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील कोणीच अधिकारी नव्हता. यामुळेच अखेर बर्वे यांची लाचलुचपत विभागाच्या प्रमुखपदावर नियुक्ती करण्यात आली.

Post Bottom Ad