प्रकाश आंबेडकर, राजू शेट्टी एकत्र येणार


अकोला - वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख तथा भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी एकत्र येण्याचे संकेत प्राप्त झाले असून, त्या अनुषंगाने पहिली बैठक अकोल्यात पार पडली. या बैठकीत येत्या ६ ऑक्टोबर रोजी दोन्ही नेत्यांची मुंबई येथे बैठक होणार आहे.

शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शनिवार, २९ सप्टेंबर रोजी ॲड. आंबेडकर यांची यशवंत भवन येथे भेट घेऊन त्यांना या नवीन आघाडीचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. दीड तास चाललेल्या या चर्चेत नेमके काय ठरले याची माहिती मात्र मिळू शकली नाही. दरम्यान, ॲड. बाळासाहेब आंबेडकर व खा. राजू शेट्टी यांची ६ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक ठरली आहे. ॲड. आंबेडकर यांचे खा. शेट्टी सोबत दूरध्वनीवरून बोलणेही झाले आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडी सोबत जाण्यासाठी बैठकी सुरू असताना ॲड. आंबेडकर यांच्यासोबत आघाडीची बोलणी करून त्यांच्यावर दबाब तंत्र वापरण्याची ही राजकीय खेळी असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. ॲड. आंबेडकर यांनी महाराष्ट्रात एमआयएमशी हातमिळवणी करून एक मोठी शक्ती तयार केली आहे. त्यामध्ये जर स्वाभिमान शेतकरी संघटना सहभागी झाली, तर महाराष्ट्रात एक तिसरी मोठी आघाडी निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत.
Previous Post Next Post