भारिप बहुजन आघाडीशी चर्चा करणार - अशोक चव्हाण


नाशिक - भाजपविरोधात राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांची महाआघाडी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व एमआयएम वगळता सर्व पक्षांना या महाआघाडीत सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सांगितले. भारिप बहुजन महासंघ व एमआयएमच्या आघाडीबाबत भारिप महासंघाने घाईगडबडीत निर्णय घेऊ नये, असे सांगत चव्हाण यांनी, याबाबत प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले.

नाशिक काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजप सरकारच्या अपयशाचा पाढा वाचण्यासाठी काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रापासून संघर्ष यात्रेला सुरवात केली. महागाई, इंधन दरवाढ यांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत. मात्र, सरकारने यावर मौन साधले असल्याचे चव्हाण म्हणाले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान आधारभूत किंमत देण्यासाठी काढलेल्या शासन आदेश रद्द करण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. यात शेतकरी व व्यापाऱ्यांना मारण्याचे सरकारचे धोरण आहे. मात्र, किमान आधारभूत किंमत सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीबाबत चर्चेची पहिली फेरी झाली आहे. जागावाटपाच्या फॉम्र्युल्याबाबत लवकरच बैठक घेऊन चर्चा केली जाणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.