Type Here to Get Search Results !

पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश


मुंबई - क्रीडा सराव अधिक प्रभावी व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये स्वत:च्या पलीकडे जाण्याची वृत्ती निर्माण व्हावी, संघभावना वाढीस लागण्यासह 'क्रीडा चैतन्य' विकसित व्हावे, यासाठी मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या वर्षापासून क्रीडा गणवेश दिले जात आहेत. यांमध्ये टी शर्ट, ट्रॅक पँटसह कापडी बुटांचाही समावेश असणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली..

महापालिकेच्या अकराशे पेक्षा अधिक शाळांमधून सुमारे साडेतीन लाख विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवत आहेत. पुस्तकीय अभ्यासक्रमासोबतच मनपा शाळांमध्ये विविध क्रीडा प्रकारांचेही प्रशिक्षण दिले जाते. यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासोबतच निर्णय क्षमता आणि एकंदरीत व्यक्तिमत्त्व विकास साधण्यास देखील मदत होते. यादृष्टीने मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना या वर्षापासून क्रीडा गणवेश देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लाल, निळा, हिरवा किंवा पिवळा अशा चार रंगांपैकी एका रंगाच्या 'टी शर्ट'चा समावेश असलेल्या या गणवेशांमुळे आता मनपा शाळांच्या मैदानांवर नव्या उत्साहासह अभिनव 'क्रीडा चैतन्य' दिसून येत आहे, असेही जऱ्हाड यांनी सांगितले. मनपा शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये शालेयस्तर, विभागस्तर, राज्यस्तर यासह राष्ट्रीय स्तरावर देखील आपल्या क्रीडा नैपुण्याचा ठसा उमटवला आहे. क्रीडा कामगिरीस सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपर्यंतही मजल मारली आहे. मनपा शाळांतील ज्या विद्यार्थ्यांची एखाद्या विशिष्ट क्रीडा प्रकारात अधिक गती असेल, त्या विद्यार्थ्यांना त्या-त्या क्रीडा प्रकारास आवश्यक असणारा 'क्रीडावेश' व 'क्रीडा साहित्य' सन १९९१ पासून देण्यात येत आहेत. हा 'क्रीडावेश' हा प्राधान्याने प्रत्यक्ष स्पर्धांच्या वेळी किंवा विशेष सराव करतेवेळी वापरण्यात येतो. उदाहरणार्थ, हॉकी, ज्युडो, तायक्वांदो, इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी आवश्यक असणारा वैशिष्ट्यपूर्ण 'क्रीडा गणवेश' व 'क्रीडा साहित्य'. मात्र, एखाद्या ठरावीक क्रीडा प्रकारात गती असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या मैदानावर खेळताना किंवा खेळांचा सराव करताना वेगळा असा 'क्रीडा गणवेश' आतापर्यंत नव्हता. हे लक्षात घेऊन महापालिका शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना 'क्रीडा गणवेश' देण्यास या वर्षीपासून सुरुवात करण्यात आली आहे. दर शनिवारी घेतल्या जाणाऱ्या विशेष सरावादरम्यान या वर्षापासून देण्यात आलेला क्रीडा गणवेश असणे अनिवार्य करण्यात आले आहे, अशीही माहिती जऱ्हाड यांनी दिली.
Tags

Top Post Ad

Below Post Ad