उपनगरांतील विद्यार्थ्यांना सरकारी दाखले घरपोच मिळणार


मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राज्य सरकारच्या वतीने दिले जाणारे विविध दाखले उपनगरांतील विद्यार्थ्यांना आता अर्ज केल्यापासून अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत घरपोच मिळणार आहेत. उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय आणि भारतीय टपाल खाते यांच्या मते त्यासाठीचा सामंजस्य करार झाला आहे, अशी माहिती उपनगर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर, वयाचा पुरावा, राष्ट्रीयत्वाचा दाखला, वास्तव्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आदी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारे विविध दाखले मिळवताना विद्यार्थ्यांची प्रचंड दमछाक होते. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तर सरकारी कार्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची झुंबड उडते. त्यामुळे प्रशासनावरही अतिरिक्त ताण पडतो. परिणामी, काही दलाल मंडळी याचा लाभ उठवतात. हे सर्व टाळण्यासाठी आणि हे दाखले विद्यार्थ्यांना सहज प्राप्त व्हावेत, यासाठी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने टपाल खात्याशी सामंजस्य करार केला असून, त्यानुसार हे सर्व दाखले अर्ज केल्यापासून अवघ्या ४८ तासांमध्ये विद्यार्थ्यांना घरपोच प्राप्त होणार आहेत, असे कुर्वे यांनी सांगितले. माहीम कॉजवे ते दहिसर, कुर्ला ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे अशी मुंबई उपनगर जिल्ह्याची हद्द आहे. कोकण विभागाच्या अंतर्गत हा जिल्हा येतो. या नव्या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दाखल्यांमध्ये होणारी बनवाबनवी टाळण्यासाठी दाखल्यांवर संबंधित विद्याथ्र्याचे छायाचित्र लावण्याचा निर्णयही जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला आहे असे कुर्वे यांनी सांगितले.
Tags