विकासाची दहीहंडी फोडून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविणार- मुख्यमंत्री

मुंबई - दहीहंडीच्या थराप्रमाणे ‘बलवान गोविंदा खालच्या थराला तर कमजोर गोविंदा वरच्या थराला’ याप्रमाणेच राज्यातील कमजोर वर्गाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. विकासाची दहीहंडी फोडून शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोहोचविणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रतिकात्मक दहीहंडी फोडून अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढण्याची गोविंदा पथकांना प्रेरणा दिली.

आमदार राम कदम यांनी घाटकोपर येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते, यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला समानतेची वागणूक देण्याचा संदेश या दहीहंडीतून मिळतो. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचाराची दहीहंडी फोडण्याचा संकल्प आपण सर्वांनी करूया, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. यावेळी खासदार किरीट सोमय्या, आमदार प्रसाद लाड, सिनेअभिनेते शेखर सुमन यांच्यासह विविध मंडळाचे गोविंदा पथक व नागरिक उपस्थित होते.