Type Here to Get Search Results !

भाजपा-सेनेविरुद्ध समविचारी पक्षांची महाआघाडी


मुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी समविचारी पक्षांची महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री झालेल्या संयुक्त बैठकीत घेतल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांना दिली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. जवळजवळ तासभर झालेल्या या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुशीलकुमार शिंदे, राधाकृष्ण विखे-पाटील, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, शरद रणपिसे, नसीम खान, विजय वडेट्टीवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर आदी नेते उपस्थित होते. येत्या निवडणुकीत देशात महाआघाडी होईलच. पण राज्यात याची सुरुवात करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते पुढाकार घेतील. यासाठी विखे-पाटील यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली आहे. दोन्ही पक्षांचे नेते इतर समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर महागठबंधनाला आकार येण्यास सुरुवात होईल आणि त्यातून येणारा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळवण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad