बेपत्ता विद्यार्थिनी कुर्ल्यात आढळल्या


मुंबई - कुलाबा परिसरात असलेल्या एका शाळेतील पाच विद्यार्थिनी शुक्रवारपासून बेपत्ता होत्या. त्या शनिवारी कुर्ला रेल्वे स्थानक येथे आढळून आल्या. या सर्व विद्यार्थिनी सुखरूप असून, त्यांचा ताबा पालकांकडे देण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली.

कुलाबा येथे फोर्ट कॉन्व्हेट स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या या पाच विद्यार्थिनी शुक्रवारी शाळेचा ओपन डे झाल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यांना परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्या नाराज झाल्या होत्या. दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर या मुली घरी न जाता मरिन ड्राईव्ह येथे बसल्याचे शेवटचे दिसण्यात आले होते. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याचे समोर आले. मुली घरी न आल्यामुळे धास्तावलेल्या पालकांनी आधी शाळेत धाव घेत विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मिसिंगची तक्रार नोंद करून बेपत्ता मुलींचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. पोलिसांची ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. वेगवेगळी पथके विद्यार्थिनींचा शोध घेण्याकरिता इतरत्र रवाना करण्यात आली होती. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या ट्विटरवरूनदेखील या बेपत्ता मुलींची माहिती देण्यात आली होती. एक रात्र उलटून गेल्यानंतर शनिवारचा दिवस उजाडला. मात्र या मुलींचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने पोलिसांवरील दबाव वाढत होता. याच वेळी या बेपत्ता मुली शुक्रवारी दुपारनंतर मरिन ड्राईव्हवरून हँगिंग गार्डन अशा पायी चालत प्रवास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर त्यांनी टॅक्सीने दादर रेल्वे स्थानक गाठले व तेथून त्या लोकलने ठाणे येथे गेल्या. त्यानंतर त्या पुन्हा कुर्ला स्थानकात आल्या. त्या वेळी त्यांच्या शोधात असलेल्या पोलिसांच्या नजरेस त्या पडल्या. त्यानंतर पाचही मुलींना पोलिसांनी त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
Tags