दहीहंडी- कोर्टाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई


मुंबई - गेल्या वर्षी न्यायालयाने घातलेल्या अटी व नियमांचे पालन करण्याची सक्ती मुंबई पोलिसांनी गोविंदा पथकांवर व दहीकाला उत्सव आयोजित करणाऱ्या आयोजकांवर केली. या अटी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोविंदा पथकांवर व आयोजकांवर कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. १४ वर्षांखालील मुलगा अथवा मुलगी उंच थरावर दहीहंडी फोडण्यासाठी पाठवणाऱ्या अशा पथकावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना दिले गेले आहेत. २५ फुटांच्या वर दहीहंडी बांधू नये तसेच आयोजकांनी गोविंदा पथकांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांची करडी नजर तसेच महागाईमुळे यंदा लाखो रुपयांच्या दहीहंडींची संख्या कमीच असणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ठाण्यामध्ये लाखो रुपयांच्या हंडी उभारल्या जात असल्याने नऊ थरांवरील या हंडी फोडण्यासाठी मुंबईतील अनेक नामवंत व्यायामशाळांचे गोविंदा ठाण्याची व नवी मुंबईची वाट धरतात. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने विविध राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांची पोस्टर्स जागोजागी लावण्यात आली आहेत. गिरगाव, वरळी, लालबाग, परळ, दादर आदी भागात ही पोस्टर्स मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. त्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेस पक्ष आघाडीवर आहेत. सोमवारच्या दहीकाला उत्सवात कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून पोलिसांनी शहरभर कडक बंदोबस्त ठेवला आहे. महिलांवर पाण्याचे फुगे, प्लास्टिकच्या पिशव्या मारणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: बस व रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलांवर काही उत्साही तरुण फुगे मारतात, अशांवरही कडक नजर असणार आहे. सोमवारच्या दहीकाला उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरभर पोलिसांनी नाकाबंदी केली होती.
Tags