महाराष्ट्राला मिळणार १ लाख १८ हजार व्हीव्हीटॅप मशिन


मुंबई - मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस, शिवसेना, मनसे सेनेसह इतर विरोधी पक्षांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणुका अधिकाधिक पारदर्शक वातावरणात पार पडाव्यात यासाठी कंबर कसली आहे. नेमक्या कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले, याची खातरजमा मतदाराला व्हावी यासाठी १ लाख १८ हजार ५०० व्हीव्हीटॅप मशिन्स महाराष्ट्राला मिळणार आहेत. व्हीव्हीटॅपमुळे मतदारांच्या मनात असणारा संशय दूर होणार आहे.

ईव्हीएमवर सत्ताधारी शिवसेनेसह बहुतांश सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. मतदान कोणत्याही पक्षाला केले तरी विशिष्ट अशाच पक्षाला मत जाते, असा त्यांचा आरोप आहे. आगामी निवडणुका या ईव्हीएमवर नकोत तर बॅलेटपेपर म्हणजेच पूर्वापार चालत आलेल्या मतपत्रिकेवरच घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. ईव्हीएमवर आक्षेप घेणे म्हणजे अप्रत्यक्षरीत्या निवडणूक आयोगावरच आक्षेप घेण्यासारखे आहे. यामुळे निवडणुका पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राला १ लाख १८ हजार ५०० व्हीव्हीटॅप मशिन्स मिळणार आहेत. व्हीव्हीटॅप मशिनचे वैशिष्ट्य म्हणजे ते ईव्हीएमला जोडण्यात येत असते. व्हीव्हीटॅपमुळे मतदान कोणत्या उमेदवाराला केले, हे केवळ सात सेकंदात कळते. तशी स्लिपच दिसते. फक्त ही स्लिप मतदाराला मिळत नाही. या स्लिपचा वापर क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी मात्र होऊ शकतो. राज्यात एकूण ९५ हजार मतदान केंद्रे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्राच्या ताब्यात ३७ हजार १४० व्हीव्हीटॅप यंत्रे आली आहेत. ११ जिल्ह्यांत ती रवानाही करण्यात आली आहेत. उर्वरित यंत्रे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. 

मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांत व्हीव्हीटॅप यंत्रे वापरायची किंवा नाही याचा निर्णय घेणे सर्वस्वी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या हातात असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १३ मतदारसंघात तर नुकत्याच पार पडलेल्या पालघर, भंडारा लोकसभा पोटनिवडणुकांत व्हीव्हीटॅपचा वापर करण्यात आला होता. त्यातील काही ठिकाणी ही यंत्रे बंद पडल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. मात्र, आता नवीन व्हीव्हीटॅप यंत्रे मागवण्यात येणार आहेत.