हरियाणात विद्यार्थिनीचे अपहरण व सामूहिक बलात्कार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

14 September 2018

हरियाणात विद्यार्थिनीचे अपहरण व सामूहिक बलात्कार


चंदीगड - एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण करून १२ नराधमांनी तिच्यावर नृशंसपणे सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना हरियाणातून समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे. तर पीडितेच्या मातेने संबंधित नराधमांना तातडीने शिक्षा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. कठोर कायदे करूनही देशात बलात्काराच्या घटनांवर अंकुश लावण्यात अपयश येत असल्याचे या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना येथे राहणारी एक १९ वर्षीय विद्यार्थिनी बुधवारी कोचिंग क्लासहून घरी परतत असताना तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तिचे अपहरण केले. यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने मादक द्रव्य पाजले. तेथून एका निर्जन स्थळी घेऊन गेल्यानंतर या तिघांसह एकूण १२ जणांनी या असहाय युवतीवर अत्यंत नृशंसपणे अत्याचार केला. युवती बेशुद्ध होईपर्यंत हे नराधम तिच्या अब्रूचे लचके तोडत होते. मुलगी बेशुद्ध झाल्यानंतर त्यांनी तिला कनिनातील एका बस स्टॉपजवळ आणून टाकले आणि तिच्या घरच्यांना फोन करीत तुमची मुलगी बस स्टॉपवर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे सांगितले. यानंतर मुलीच्या माता-पित्यांनी घटनास्थळी धाव घेत तिला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले. यानंतर पालकांनी याची तक्रार नोंदविण्यासाठी पोलिसांत धाव घेतली. मात्र, घटनास्थळाच्या अधिकार क्षेत्रावरून पोलिसांनी सुरुवातीला त्यांना टोलवाटोलवीची उत्तरे दिली. अखेर रात्री एक वाजता संबंधित आरोपींविरोधात झिरो एफआयआर नोंदवून घेण्यात आला. झिरो एफआयआरमध्ये तीन आरोपींची नावे असून, हे तिघेही पीडितेच्या गावातील रहिवासी असल्याचे महेंद्रगडचे पोलीस अधीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले. हे तिघेही फरार आहेत व त्यांचा शोध घेतला जात असल्याचेही ते म्हणाले. घटनेतील पीडिता ही सीबीएसई बारावीच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. या यशाबद्दल तिचे राज्यपातळीवर चांगलेच कौतुकही झाले होते. पंतप्रधान म्हणतात बेटी बचाओ, बेटी पढाओ. मात्र, जर आमच्या मुली सुरक्षित नसतील तर त्यांना शिक्षणासाठी घराबाहेर कसे पाठवावे, असा आर्त सवाल पीडितेच्या मातेने केला आहे. आम्हाला फक्त न्याय हवा आहे, आरोपी अजूनही मोकाट आहेत, असेही पीडितेच्या मातेने म्हटले आहे.

Post Top Ad

test