Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भारतात मान्सूनचे आतापर्यंत १४०० बळी


नवी दिल्ली - मान्सूनने यंदा महाराष्ट्रासह देशातील १० राज्यांमध्ये जोरदार थैमान घातले आहे. मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत १४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टी आणि पुराचे सर्वाधिक ४८८ बळी केरळमध्ये गेले. तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत १३९ जण गतप्राण झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी सांगितले.

केरळमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे ४८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले. राज्यातील १४ जिल्ह्यांमधील जवळपास ५४.११ लाख लोकांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिक्रिया केंद्र अर्थात एनईआरसीने आकडेवारी जारी करताना दिली. गत शतकातील सर्वात वाईट स्थितीचा केरळला सामना करावा लागत आहे. पुरामुळे बेघर झालेल्या १४.५२ लाख लोकांना बचाव शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. तर ५७,०२४ हेक्टरवरील पिके वाहून गेली आहेत. यादरम्यान या राज्यांमध्ये ४३ जण बेपत्ता झाले. तर या दहा राज्यांमध्ये पुरासंबंधीच्या विविध घटनांमध्ये ३८६ जण जखमी झाले. याशिवाय या राज्यांमधील हजारो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली आहे.

उत्तर प्रदेशात १० जण ठार -उत्तर प्रदेशात वीज कोसळण्याच्या घटनेसह मुसळधार पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जण ठार, तर अन्य ९ जण जखमी झाले असल्याची माहिती एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी दिली आहे. याबाबत मदत आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले की, रविवारी रात्रीपासून राज्यात वीज कोसळण्यासह अन्य पावसाशी संबंधित घटनांमध्ये १० जण ठार, तर ९ जण जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, झाशी येथे ४ जण मरण पावले, इटावा येथे २ जण आणि फिरोजाबाद, रायबरेली, अररिया आणि शामली येथे प्रत्येकी १ जण मरण पावला आहे. या काळात पावसामुळे ११६ घरे आणि झोपड्यांचे नुकसान झाले असून, चार जनावरेही दगावली आहेत.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom