म्हाडा मित्र कक्षात ४ वर्षात ५० हजार पैकी ३७ हजार अर्ज निकाली

Anonymous

मुंबई - म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सुरू असलेल्या आणि महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्याच्या अंमलजावणीसाठी राबवण्यात आलेल्या ऑनलाईन लोकसेवा सुविधा केंद्राच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांत ५० हजार ६६२ अर्जापैकी ३७ हजार ६६४ अर्ज निकाली काढण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. मित्र सेवा सुरू केल्यानंतर सर्वसामान्यांकडून या सुविधा केंद्राला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने म्हाडा अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. डिजिटल महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत सर्वसामान्यही काळानुसार डिजिटल माध्यमांचा अधिकाधिक वापर करत असून याचा लाभ ते घेत असल्याने म्हाडाची कार्यप्रणाली पारदर्शक होण्यास मदत ठरत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची सर्वप्रथम शासकीय संस्था आहे. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालात १२ ऑगस्ट २०१५ रोजी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते म्हाडातील मित्र या ऑनलाईन सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले होते. या केंद्राच्या माध्यमातून निवासी सदनिका / भूखंड भोगवटा बदल (हस्तांतरण), अनिवासी सदनिका / भूखंड भोगवटा बदल (हस्तांतरण), निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण, अनिवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण, थकबाकी बाबतचे ना देय प्रमाणपत्र, सदनिका / भूखंड / व्यापारी गाळा वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना हरकत प्रमाणपत्र, सदनिका / व्यापारी गाळा विक्री परवानगी, भूखंड विक्री परवानगी, भूखंडाची उर्वरित खरेदी किंमत (बी.पी.पी.) / कर्जाची थकबाकी भरणा पत्र, सदनिकेचा उर्वरित भाडेखरेदी हप्ता (एच.पी.एस.) / भरणा पत्र, सदनिका / भूखंड / व्यापारी गाळ्याच्या नस्तीतील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती, निवासी सदनिका भाडे तत्त्वावर देण्यास ना हरकत प्रमाणपत्र, सदनिका / भूखंड / व्यापारी गाळेधारकांना सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे इत्यादी सुविधा ऑनलाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
Tags