म्हाडाच्या प्रकल्पांची उदय सामंत यांनी केली पाहणी

Anonymous

मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्ष उदय सामंत यांनी आज म्हाडाच्या मुंबई व कोंकण मंडळाच्या अखत्यारीतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांची पाहणी करून आढावा घेतला. 

मुंबई मंडळाच्या बांगूर नगर येथील पहाडी गोरेगाव प्रकल्पाच्या पाहणीदरम्यान प्रकल्पासाठीच्या ७ हेक्टर भूखंडावरील काही भागावर पडलेले आरक्षण उठवण्यासंदर्भात नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी तातडीने सुनावणी घ्यावी यासाठी म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करण्याचे आदेश सामंत यांनी दिले. या भूखंडाचे सीमांकनही तात्काळ निश्चित करण्यासाठी संबंधित विभागाशी समन्व्यय साधावा, अशा सूचना सामंत यांनी अधिकाऱ्यांना केल्या. 

सिद्धार्थ नगर येथील पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पाहणी दरम्यान सामंत यांनी रहिवाशांशी चर्चा केली. सदरहू प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या विषयासंदर्भात नियमांच्या अधीन राहून कायदेशीर मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यासाठी तसेच म्हाडाने आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही वेगाने होण्यासाठी संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याची सूचना सामंत यांनी केली. 
 
दरम्यान, तुंगवा पवई येथील प्रकल्पाला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. नवघर मुलुंड येथील पुनर्विकास प्रकल्पाला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेऊन या संदर्भातही पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्याची सूचना सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

कोंकण मंडळाच्या नुकत्याच काढलेल्या सोडतीत विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गतच्या मौजे अंतार्ली (ता. कल्याण) येथील प्रकल्पाला सामंत यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान सामंत यांनी पलावा डेव्हलपर्सच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी विजय लहाने उपस्थित होते.  सामंत यांनी मौजे अंतर्ली येथील या योजनेत पात्र ठरलेल्या यशस्वी अर्जदारांना संबंधित विकासकाने सदनिका बघू देण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर उद्यापासून पात्र अर्जदारांना सदनिका बघू दिली जाईल, असे आश्वासन विकासकाच्या अधिकाऱ्यांनी म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांना दिले.
Tags