मोदींनी व्यापाऱ्यांची वाट लावली - राज ठाकरे


धुळे - शहरांमधील लोकसंख्या वाढत आहे. परिणामी, शहरांवरचा ताण वाढला असून विविध समस्या निर्माण होत आहेत. घरातून बाहेर पडल्यावर समाधान वाटत नाही. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर खरंच वाईट वाटते. केवळ आपल्या तुंबड्या भरण्याच्या राजकारणाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. ज्या व्यापाऱ्यांनी नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवले, त्या व्यापाऱ्यांची देखील या सरकारने वाट लावली, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इतर राजकीय पक्षांना हाणला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उत्तर महाराष्ट्रीय कार्यकर्ता मेळावा रविवार,२ सप्टेंबर २०१८ रोजी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या वेळी नरेंद्र मोदींना विरोधाचे कारण स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले, देशात राजीव गांधी यांचे पूर्ण बहुमताचे सरकार सन १९८४ मध्ये आले होते. त्यानंतर मोदींना बहुमत मिळाले. ३० वर्षांनंतर बहुमत मिळाल्यावर ज्या गोष्टी होणे अपेक्षित होते, ते झाले नाही. मोदींनी नोटाबंदी केली. पण त्यांनी देशातील लोकसंख्या नियंत्रणाला हात घातला पाहिजे होता. ज्या व्यापाऱ्यांनी नरेंद्र मोदींना सत्तेवर बसवले, त्या व्यापाऱ्यांची वाट लावली.