अग्निशमन दलाने ड्रोनचा वापर करावा

Anonymous

मुंबई - मुंबईत आगी लागण्याचे प्रकार सतत घडत असतात. आग विझवताना अनेकवेळा जवान जखमी होत असतात. यामुळे आगीची नेमकी परिस्थिती जाणून घेण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने ड्रोनच्या कॅमेराचा वापर करावा, अशी मागणी सुधार समिती अध्यक्ष व शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी केली आहे.  

मुंबईत वाढत्या लोकसंख्येनुसार विकासाची कामे वाढत आहेत आणि राहण्यासाठी उंच टॉवर उभारले जात आहेत. यामध्ये अनेक टॉवर हे 60 मजल्यांपेक्षाही जास्त उंचीच्या इमारती आहेत. या इमारतींमध्ये वरच्या मजल्यांवर आग लागल्यास अग्निशमन दलाकडील 90 मीटर उंचीची शिडी व साधन सामग्री पाहिल्यास अशा ठिकाणी आग विझविण्यासाठी अडचण निर्माण होते. तसेच 28-30 मजल्यावरील भागात आग लागल्यास आगीचा अंदाज बांधणे, आगीची तीव्रता लक्षात यायला अवघड होते. त्याचप्रमाणे अग्निशमन दलाला एवढ्या उंचीवरील आगीप्रसंगी काही मर्यादा येतात. त्यामुळे जर आग विझविण्यात विलंब झाल्यास त्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात वित्तीय हानी, जीवित हानी होण्यायाची व जखमींची संख्या वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात उदभवू शकते. त्यामुळे अग्निशमन दलाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आगी विझविण्यासाठी केल्यास ते अधिक सोयीस्कर ठरू शकते. अग्निशमन दलाने ही वस्तुस्थिती लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत एखाद्या घटनेचे स्वरूप लक्षात येण्यासाठी व त्याचाआढावा घेण्यासाठी दलाने ड्रोन कॅमेराचा वापर करावा, अशी सूचना शिवसेनेचे नगरसेवक व सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी केली.
Tags