सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज


मुंबई - गणेशोत्सवासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यासाठी राज्य राखीव पोलीस दल, शीघ्र कृती दल, दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक-रोधक पथके तैनात करण्यात आली आहेत. वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनच्या मदतीने गर्दीवर लक्ष ठेवले जाणार आहे. अनेक मुख्य रत्स्ते वाहतुकीसाठी बंद तर काही ठिकाणी एकतर्फी वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांनी लालबाग, परळ या मोठी गणेश मंडळे असलेल्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला असून गणेशोत्सवाबरोबरच मोहरम सणादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी ४५ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत साजरा होणाऱ्या गणेशोत्साची महती देशातच नव्हे, साता समुद्रापार पोहोचली आहे. देशविदेशातून गणेशभक्त मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सव मंगळांना भेट देतात. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे पोलिसांना मोठे आव्हान असते. मात्र, मुंबई पोलीस अतिरिक्त पोलीस बलाच्या मदतीने शहरातील मोठी सार्वजनिक गणेश मंडळे साजरा करणाऱ्या गणेशोत्सव भक्तिभावाने व शांततेत पार पाडला जातो. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात ठेवला जातो. गर्दीचा फायदा घेऊन दशतवादी कृत्य वा अप्रिय घटना घडू नये यासाठी गणेशोत्सवाआधीच पोलीस सुरक्षा व्यवस्थेच्या उपाययोजना करतात. लालबाग, परळ या परिसरात लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी आदी गणेश मंडळांच्या गणेशदर्शनासाठी देशविदेशातून आलेले गणेशभक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. गणेशोत्सवातील ११ दिवस सतत येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यावर नियंत्रण ठेवण्याकामी पोलिसांनी कसरत करावी लागते. या परिसरासाठी यंदा ११ पोलीस आयुक्त, ४ एसीपी, २० पोलीस निरीक्षक, सपोनि. ५९, पोलीस अंमलदार ५००, राज्य राखीव पोलीस बलाची तुकडी, दंगल नियंत्रण पथक, सीसीटीव्ही व्हॅन, कॉम्बॅक्ट व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच स्वयंसेवक, एनसीसी, तटरक्षक संस्थांचा सुरक्षेकामी सहभाग असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेड काढणाऱ्यांना व लहान मुलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेषात पोलीस गस्त ठेवण्यात येणार आहे. चौपाटी तसेच विसर्जनाच्या ठिकाणी महानगरपालिका, तटरक्षक दल व नौदलाचा समन्वय ठेवून बोटी व लॉन्च तैनात करण्यात येणार आहेत.
Tags