सायन तलाव बंद करण्यास विरोध

Anonymous
मुंबई - शीव येथील 80 वर्षापूर्वीचे प्रसिध्द असलेले सायन तलाव पुढील वर्षी बंद करण्याच्या निर्णयाला शिवसेनेने शुक्रवारी स्थायी समितीत तीव्र विरोध केला. काही दिवसांपूर्वी तेथे पालिकेने बंद करण्याबाबतचे तसे नोटिस लावले आहे. मात्र प्रशासनाने कोणत्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता हा निर्णय घेतल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. तलाव बंद करण्याच्या निर्णयाबाबत प्रशासनाने फेर विचार करावा असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्रशासनाला दिले.

मागील 80 वर्षापासून सायन तलावात परिसरातील गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. मुंबईतील सर्वात मोठे तलाव आहे. असे असताना दीड दिवसाच्या गणेश विसर्जनाच्या वेळी प्रशासनाने हे तलाव पुढील वर्षीपासून बंद केले जाणार असल्याची नोटिस चिकटवले आहे. इतकी वर्ष गणेश विसर्जन येथे मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यामुळे तलाव बंद झाल्यास विसर्जन कुठे करणार असा प्रश्न येथील रहिवाशांकडून उपस्थित केला जातो आहे. हा निर्णय घेताना स्थानिक नगरसेवक, लोकप्रतिनिधींना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न विचारत प्रशासनाने हा तलाव बंद करण्य़ाचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी मंगेश सातमकर यांनी हरकतीच्या मुद्द्य़ाद्वारे केली. काही वर्षापूर्वी हे तलाव बुजवण्याचा घाट घातला जात होता. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विरोध केल्याने हा निर्णय प्रशासनाने मागे घेतला. आता पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. केमिकलमुळे मासे मरतात, पर्यावरणाचा -हास होतो, हे मान्य असले तरी बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. विसर्जनासाठी योग्य असलेले हे तलाव बंद करू नये. चिकटवलेले नोटिस काढून बंद केले जाणार नाही, अशी नोटिस तेथे लावावी अशी मागणीही सातमकर यांनी स्थायी समितीत केली. लोकप्रतिनिधींना विचारात न घेता तलाव बंद करण्याचा निर्णय योग्य नाही. मात्र या तलावाच्या नावावर पैसे घेऊन धंदा केला जातो. तसेच केमिकलमुळे कासव, मासे मरतात हे खरे आहे. त्यामुळे गणेश विसर्जनासाठी बाजूला कृत्रिम तयार करून प्रशासनाने पर्याय काढावा, असे भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी सांगितले. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सातमकर यांच्या हरकतीच्या मुद्द्य़ाला समर्थन करीत तलाव बंद करण्याचा निर्णय घेताना प्रशासनाने स्थानिक लोकप्रतिनिधींना का विचारले नाही असा प्रश्न त्यांनी विचारला. इतकी वर्ष या तलावांत गणशे मूर्तींचे विसर्जन केले जात असताना लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता तलाव बंद करण्याचा निर्णय घेणे योग्य नाही. प्रशासनाने यावर विचार करावा असे निर्देश देत स्थाय़ी समिती अध्य़क्ष यशवंत जाधव यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात येत असल्याचे जाहिर केले.
Tags