Type Here to Get Search Results !

महापौर बंगल्याच्या तळघरात शिवसेनाप्रमुखांचे स्मारक


मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा तिढा सुटला असून महापौर बंगल्याच्या तळघरात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे स्मारक महापौर बंगल्याची तोडफोड किंवा झांडाचीही कत्तल न करता, उभारले जाणार असून या स्मारकासाठी ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने परवानगी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

महापौर बंगल्यात शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार होते. मात्र, महापौर निवासाचा प्रश्न निर्माण झाला होता. मलबार हिल, राणी बागमधील बंगल्यांचे पर्याय पुढे आले होते. प्रशासनाच्या चालढकलपणामुळे महापौर बंगल्याचा तिढा सुटत नव्हता. आता महापौर बंगल्याच्या तळघरातच स्मारक उभारण्याच्या हालचाली सुरु आहेत. मुंबई ऐतिहासिक वारसा संवर्धन समितीने नुकतीच महापौर बंगल्याला भेट दिली. त्यावेळी समितीकडून या बंगल्याचे आणि पुतळ्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. महापौर बंगल्याची वास्तू २३०० चौरस फूट आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मारक बांधण्यासाठी या वास्तूची जागा अपुरी असून तळघराचा तब्बल ९००० चौरस फूटांचा परिसर स्मारकासाठी योग्य असल्याचे समितीने म्हटले आहे. तळघरात स्मारक बनविल्यास बंगला परिसरातील लॉन्सही अबाधित राहतील, असे समितीचे म्हणणे आहे. सन १९२८ साली हा बंगला बांधण्यात आला होता. त्यानंतर १९६२ साली महापालिकेने तो विकत घेतला. तर डॉ. बीपी. देवगी यांना महापौर म्हणून या बंगल्यात राहण्याचा पहिला मान मिळाला. सन १९६४- ६५ मध्ये या बंगल्याचा महापौरांसाठी अधिकृतपणे वापर करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे ज्या शिवाजी पार्कमधून दसरा मेळाव्याला शिवसैनिकांना संबोधित करायचे, तेथून जवळच हा महापौर बंगला आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी हेच ठिकाण उत्तम असल्याचेही समितीने म्हटले आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे डिझाईन आर्किटेक आभा नरेन लांबा यांनी बनवले असून त्यानुसार, बंगला परिसरातील उत्तर-पूर्वेला असणारी नोकर आणि ड्रायव्हर्सची घरे पाडण्यात येणार आहेत. तेथे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा असेल. तर दक्षिण-पूर्वेला पार्किंगसाठी जागा ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी बंगला परिसरातील आवारात काही बदल करण्यात येतील. दरम्यान, या बंगल्यात बाळासाहेबांच्या कार्टुनचे प्रदर्शन भरविण्यात येईल. बाळासाहेबांचे स्मारक होण्यासाठी ऐतिहासिक वास्तूची मोडतोड केली जाऊ नये, अथवा बंगला परिसरातील झाडांचीही कत्तल होऊ नये, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुरातत्व विभाग आणि संवर्धन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार बंगल्याचे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
Tags

Top Post Ad

Below Post Ad