सोनसाखळी चोरट्यांना अटक

Anonymous

ठाणे - दुचाकीवरून येऊन मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या अब्बास जाफरी (२७) आणि सादक जाफरी (२३) या दोन सोनसाखळी चोरट्यांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या अब्बास जाफरी (२७) आणि सादक जाफरी (२३) या दोन सोनसाखळी चोरट्यांना कासारवडवली पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सात लाख ८० हजारांचे २६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडीच्या इराणीपाड्यातील या दोघांनी गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरून येऊन वागळे इस्टेट परिमंडलातील कापूरबावडी, वर्तकनगर, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या परिसरात अनेक महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी हिसकावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ११ सप्टेंबर रोजी भिवंडीतून पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकले यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केली. त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी नऊ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये कापूरबावडीतील दोन, वर्तकनगर दोन, चितळसर दोन आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तीन असे नऊ गुन्हे त्यांच्याकडून उघड झाले आहेत. एकट्या जाणाऱ्या ४५ ते ६५ वयोगटांतील महिलांना गाठून दुचाकीवरून येऊन ही दुकली सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावून पलायन करत होती. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
Tags