Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

"वंदे गुजरात" चॅनेलवरुन शिक्षकांना मराठीत प्रशिक्षण - विनोद तावडे


मुंबई - राज्यामध्ये २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इ.१ ली व इ. ८ वी ची पाठ्यपुस्तके पुनर्रचित करण्यात आली आहेत. सदर पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातील शिक्षकांना डिजिटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने आयोजित केला आहे. हे प्रशिक्षण गुजरात सरकाराच्या वंदे गुजरात या चॅनेलमार्फत देण्यात येणार आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. गुजरात सरकारकडे स्वत:ची १६ शैक्षणिक चॅनेल आणि वाहिन्या सुरु असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची सुविधा गुजरात सरकारने दर्शविली. त्यानुसार गुजरात सरकारच्या 'वंदे गुजरात' या शैक्षणिक चॅनेलच्या माध्यमातून शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही  तावडे यांनी सांगितले.

शिक्षकांच्या या डिजिटल प्रशिक्षणाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे मोजावे लागले असते, परंतु गुजरात सरकारच्या स्वत:च्या १६ चॅनेलच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क DD Direct Free DTH यावर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली. राज्यातील बहुतांश शिक्षकांपर्यंत सदर माध्यमाद्वारे एकाचवेळी पोहोचता येईल, या उद्देशाने सदर प्रशिक्षण हे शैक्षणिक वाहिनीद्वारे प्रक्षेपित करून देण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा खर्चही राज्य सरकारला द्यावा लागणार नाही. जर गुजरात सरकार अशा प्रकारचे डिजिटल प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करुन देत असेल, तर या प्रशिक्षणावर राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चामध्ये नक्कीच बचत झाली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

गुजरातचे हे चॅनेल जिओ, डिटीएच, व्होडाफोन, एअरटेल या सर्व ॲपवर उपलब्ध होणार आहे. असे स्पष्ट करतानाच गुजरात सरकारने दिलेली सेवा ही विनाशुल्क आहे असे सांगितले. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यापीठांना पत्र देऊन सर्जिकल स्ट्राइक हा दिवस २९ सप्टेंबर २०१६ रोजी साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्याचे पालन देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्याकडून होणार आहे. सर्जिकल स्ट्राइक मध्ये सैनिकांनी जी विजयी कामगिरी केली ती कामगिरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे, हा नक्कीच चांगला उपक्रम आहे, असेही तावडे यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom