मुंबईच्या चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्डची नियुक्ती केली जाणार

Anonymous

मुंबई - मुंबईच्या गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई अशा सातही चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह देशविदेशातील पर्यटकांची गर्दी होते. याठिकाणी पालिकेचे ३६ लाइफ गार्ड दोन शिफ्टमध्ये तैनात असतात. यातील १२ लाइफ गार्ड कामयस्वरुपी असून इतर लाइफ गार्ड कंत्राटी स्वरुपात नेमणूक करण्यात आले आहेत. समुद्र चौपाट्यांवर पालिकेकडून लाइफ गार्ड तैनात केले असले तरी अनेक वेळा अतिउत्साही पर्यटकांमुळे जीवितहानी, दुर्घटना होण्याचे प्रसंग घडतात. या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे गोव्यात खासगी कंपनीकडून तंत्रकुशल लाइफ गार्डची नेमणूक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सातही चौपाट्यांवर ९३ लाइफ गार्डची नियुक्ती केली जाणार आहे. या जीवरक्षकांकडे लाइफ जॅकेट, रोप, सेफ्टी ट्युब, रिंग अशा सुविधा उपलब्ध असणार आहेत. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ४ ते रात्री १२ अशा वेळेत हे जीवरक्षक चौपाट्यांवर तैनात असतील. गोव्याच्या धर्तीवर ही सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार असून यावर १३ कोटी ९ लाख ७१ हजार २७६ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मे. दृष्टी लाईफ सेव्हींग प्रा. लि. या खासगी कंपनीची ३ वर्षांकरिता निवड केली आहे. मुंबईच्या चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, हा यामागचा उद्देश असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. 
Tags