भीम आर्मी संघटनेचा रावन दहनाला विरोध

Anonymous

मुंबई - दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाला परवानगी न देण्याची मागणी भीम आर्मी भारत एकता मिशन या संघटनेने केली आहे. देशातील आदिवासींचा प्रखर विरोध असणारी ही अनिष्ठ प्रथा त्वरीत बंद करण्यात यावी. तसेच रावणाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी देखील मागणी या संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. 

मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांना हे निवेदन पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर जी मंडळी रावण दहन करतील अशा लोकांविरुध्द भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३, १५३ (अ), २९५, २९८, मुंबई पोलिस अँक्ट १३१,१३४,१३५ नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशीही मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. हे निवेदन पोलीस महासंचालक, सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही देण्यात आले आहे.

राजा रावण हे अत्यंत समृध्द संस्कृतीच्या वैभवशाली वारशाचे दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण, संगीत तज्ञ, राजनितिज्ञ, शिल्पकार, नितीतज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट रचनाकार, समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गगाता, न्यायप्रिय राजा अशा अनेक गुणांचा आविष्कार करणारा महत्तम राजा होता. अशा महान राजाला इथल्या षडयंत्रकारी व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. वास्तविक राजा रावणासारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.

तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत, सर्वात मोठी मुर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५ मीटर उंचीची आहे. महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात मेळघाट, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड येथे रावणाची पूजा केली जाते. रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आहे. परंतू आदिवासींच्या या समताधिष्ठीत समाज व्यवस्थेचा उद्गाता असलेल्या न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील आदिवासी समाजासह जागृत झालेल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातात. शिवाय या दहन प्रथेमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.

देशात आणि राज्यात अनेक कालबाह्य वाईट प्रथा परंपरा बंद करण्यात आल्या. सतीची चाल यापूर्वीच बंद झाली असून विधवांना पुनर्विवाह करण्यास देखील परवानगी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदादेखील अस्तित्वात आला आहे. महाराष्ट्राने पर्यावरणाचा ऱ्हास होतो म्हणून अनेक कायदे केले असून डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आली आहे, सार्वजनिक सभेतील स्पीकर व भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण आणले आहे. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर देखील बंदी घालण्यात आली असून प्लॅस्टिकच्या पिशव्यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करीत असताना रावणाच्या भल्या मोठ्या पुतळ्याला बीभत्स स्वरूप देऊन त्यात मोठ्या आवाजाचे फटाके भरण्यात येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. याचा त्रास संबंधित विभागातील जनतेला होतो. त्यामुळे राज्य सरकारने रावण दहण करण्यास परवानगी देऊ नये, ही प्रथाच बंद करण्यात यावी अशी मागणी या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी केली आहे .