40 हजार बोनससाठी पालिका कर्मचा-यांचा 25 ऑक्टोबरला मोर्चा

Anonymous
मुंबई - मुंबई महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांना 40 हजार रुपये दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदान मिळावे या मागणीसाठी 25 ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आझाद मैदानात  असल्याची माहिती संघटनेने दिली.

भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महिन्याच्या खर्चाची तोंडमिळवणी करताना कर्मचाऱयांना नाकीनऊ येत आहे. त्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना 40 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर करावा, अशी जोरदार मागणी समन्वय समितीने पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली आहे. मुंबई पालिकेतील कामगार, कर्मचारी, अधिकारी, परिचारिका, परिसेविका, तंत्रज्ञ, अभियंते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंशकालीन, कंत्राटी कामगार यांच्यासाठी 2017-18 या वर्षासाठी प्रशासनाने 156.7 कोटींची तरतूद केलेली आहे. यामुळे बोनस देण्यात यंदा हात आखडता घेऊ नका, असे संघटनेने म्हटले आहे. तसेच पालिका कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या सामुदायिक गट विमा योजनेला दिलेली स्थगिती मागे घ्यावी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीशी चर्चा करून ही विमा योजना सुरू करावी. बायोमेट्रिक हजेरीमध्ये असलेल्या त्रुटी दूर कराव्यात तोपर्यंत बायोमेट्रिक हजेरी वेतनाशी जोडू नये अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. तसेच या मागण्यांबाबतचे एक निवेदन मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फतही आयुक्तांना दिलेले आहे. या समन्वय समितीत विविध कामगार संघटना सहभागी असल्याचे म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी सांगितले.
Tags