खेळाच्या मैदानावर दांडिया आयोजित करणाऱ्यांचे धाबे दणाणले

Anonymous
मुंबई - शहरातील बहुतेक उद्यानांची अवस्था खराब आहे. काही उद्याने चांगली आहेत. अशी उद्याने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित दांडियासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाने मुलांना खेळापासून वंचित राहावे लागणार असल्याने विनायक सानप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर न्यायालयाने क्रिडा विभागाला आपली भूमिका मांडण्यास सांगितली आहे. 

बोरीवलीतील मुलांसाठी असलेल्या खेळाच्या मैदानावर दांडिया आणि गायिका फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमासाठी देण्यात आली. त्यामुळे मुलांसाठी खेळाचे मैदान बंद होणार आहे. या कालावधीत खेळाच्या मैदानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. यामुळे खेळाच्या मैदानावर दांडियास मान्यता देण्यात येवू नये यासाठी पत्रकार सानप यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाचे न्यायधीश बी.आर.गवई, एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज (८ ऑक्टोंबर रोजी) सुनावणी झाली. त्यावेळी खेळाची मैदाने दांडियासाठी देण्याबाबत राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या क्रिडा विभागाचे काय धोरण आहे अशी विचारणी केली. तसेच याप्रश्नी क्रिडा विभागाने आपले म्हणणे न्यायालयासमोर सादर करावे असे आदेशही दिले. त्यामुळे खेळाच्या मैदानावर दांडिया आयोजित करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.