दिव्यांगांसाठीच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा

Anonymous
मुंबई - दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. दिव्यांगांच्या विकास व पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली, त्यावेळी बडोले बोलत होते. यावेळी विविध विभागाचे अधिकारी व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बडोले म्हणाले, अपंग कल्याण आयुक्तालय व शासनाच्या विविध विभागांमार्फत दिव्यांगांसाठी ज्या ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनांची सर्व विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठी येणाऱ्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात. शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात दिव्यांगांसाठी तांत्रिक शिक्षणाची अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी. दिव्यांगांच्या आरोग्य सुविधा, प्रवास सुविधा याकडे विशेष लक्ष द्यावे.

दिव्यांगांच्या विकास व पुनर्वसनाकरिता असलेल्या पाच टक्के निधीचा तातडीने सर्व विभागांनी वापर करावा. शासकीय कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी दिव्यांगांसाठीचा रॅम्पबार, शौचालय, स्नानगृह व इतर सुविधा राखीव फंडातून उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना करुन मुंबई किंवा पुणे या ठिकाणी दिव्यांगांसाठी क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही बडोले यांनी यावेळी सांगितले.