गोरगरीब रुग्‍णांना दर्जेदार आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी महापालिका कटिबध्‍द - महापौर

Anonymous

मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिका आरोग्‍य सेवेसाठी मोठया प्रमाणात आर्थिक तरतूद करीत असून गोरगरीब रुग्‍णांना दर्जेदार आरोग्‍य सेवा मोफत व किफायतशिर दरात देण्‍यासाठी महापालिका कटिबध्‍द असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केले.

बा.य.ल. नायर धर्मदाय रुग्‍णालयातील मज्‍जातंतू शल्‍य चिकित्‍सा विभागातील ‘ व्‍यापक पक्षाघात उपचार केंद्राचा व एन्‍डोव्‍हॅस्‍वयुलर न्‍युरोसर्जरी डिएसए लॅब’ चे लोकार्पण महापौर प्रिं.विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांचा हस्‍ते मुंबई सेंन्‍ट्रलच्‍या बा.य.ल. नायर धर्मदाय रुग्‍णालयातील वैद्यकीय महाविद्यालय इमारतीच्‍या सभागृहात आयोजित समारंभात आज ( दि.१२ ऑक्टोबर, २०१८) दुपारी पार पडले, त्‍यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) आय.ए.कुंदन, सार्वजनिक आरोग्‍य समिती अध्‍यक्षा डॉ. अर्चना भालेराव, ए, बी आणि ई प्रभाग समिती अध्‍यक्ष तथा स्‍थानिक नगरसेविका गीता गवळी,नगरसेवक रमाकांत रहाटे, नगरसेविका सुरेखा लोखंडे, उप आयुक्‍त (आरोग्‍य सेवा) सुनिल धामणे, उप आयुक्‍त (मध्‍यवर्ती खरेदी खाते) रामभाऊ धस, उप आयुक्‍त (परिमंडळ – १) हर्षद काळे, नायर रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. रमेश भारमल तसेच महापालिकेचे संबंधि‍त अधिकारी व डॉक्‍टर मंडळी उपस्थित होते.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर बोलताना पुढे म्‍हणाले की, महापालिका रुग्‍णालयातील डॉक्‍टर व परिचारिका आपल्‍या कुटुंबाची पर्वा न करता मुंबईसोबतच संपूर्ण देशातील रुग्‍णांना सेवा देण्‍याचे काम करित आहे. आपल्‍या कामात झोकून देणाऱया डॉक्‍टर व परिचारिकांना माझा सलाम असल्‍याचे महापौरांनी सांगितले. बृहन्‍मुंबई महानगरपालिका आरोग्‍य सेवेची दर्जोन्‍नती करण्‍याचा प्रयत्‍न करित असून जनतेचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी आम्‍ही सदैव कटीबध्‍द असल्‍याचे महापौरांनी सांगितले. रुग्‍णांसाठी आपण डॉक्‍टर मंडळी देवदूत म्‍हणून काम करित असल्‍याचे महापौरांनी शेवटी सांगितले.

अतिरिक्‍त महापालिका आयुक्‍त आय.ए.कुंदन मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, मुंबईतील वाढती लोकसंख्‍या तसेच रुग्‍णसेवेवर येणारा ताण लक्षात घेता बृहन्‍मुंबई महानगरपालिका अत्‍याधुनिक साधनांची खरेदी करित आहे.तसेच पालिकेच्‍या मोठया रुग्‍णालयातील गर्दी बघता महापालिकेचे दवाखाने सर्वसोयीसुविधांनी परिपूर्ण करण्‍याचा महापालिका प्रयत्‍न करीत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. गत काही दिवसांपासून यंत्र बंद पडत असल्‍याच्‍या येणाऱया तक्रारी लक्षात घेता नविन यंत्रसाधनसामुग्री खरेदी करण्‍यावर भर देण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.जेणेकरुन गोरगरीब रुग्‍णांना चांगली आरोग्‍य सेवा मिळू शकतील. आजचा कार्यक्रमाच्‍या यशस्वितेसाठी प्रयत्‍न करणाऱया सर्व डॉक्‍टर व परिचारिका यांना अतिरिक्‍त आयुक्‍तांनी शेवटी शुभेच्‍छा दिल्‍या.

आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा डॉ. अर्चना भालेराव यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, मुंबईतील सर्व नागरिकांना चांगली आरोग्‍य सुविधा देण्‍यासाठी बृहन्‍मुंबई महापालिका कटिबध्‍द असून महापालिका रुग्‍णालये तसेच दवाखान्‍यांचा दर्जा वाढविण्‍यासाठी महापालिका प्रयत्‍न करित असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आज आपण जे डिएसए यंत्र उपलब्‍ध करुन दिले आहे त्‍याव्‍दारे उपचाराचा खर्च बाहेरील रुग्‍णालयांमध्‍ये हा ७ ते ८ लाख रुपये येत असून महापालिका अत्‍यल्‍प दरात उपचार करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तसेच यासाठी कार्यरत असणाऱया डॉक्‍टर व परिचारिकांचे शेवटी अभिनंदन केले.

प्रारंभी मान्‍यवरांच्‍या हस्‍ते फि‍त कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करुन व्‍यापक पक्षाघात केंद्राचे लोकार्पण करण्‍यात आले. यानंतर मान्‍यवरांनी या विभागातील अद्ययावत मशिनची पाहणी करुन डॉक्‍टरांशी चर्चा केली. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती.
Tags