कांद्याच्या दर भडकण्याची शक्यता

Anonymous

नवी दिल्ली - मागील काही दिवसांमध्ये घाऊक बाजारपेठांत कांद्याच्या दरात दीड पट वाढ झाली आहे. कांद्याच्या दराची ही चाल अशीच सुरू राहिली तर दिवाळीपर्यंत घाऊक बाजारांमध्ये कांदा ४० रुपये किलोपर्यंत भडकण्याची शक्यता आहे. तसे झाले तर किरकेाळ बाजारात कांद्याचा दर ५० ते ६० च्या पुढे जाऊन ग्राहकांच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य देशात कांदा उत्पादनात आघाडीवर असलेले राज्य आहे. मात्र, खरीप हंगामात यंदा येथील कांदा पिकाची नासाडी झाली आहे. यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे दिवाळीच्या सुमारास कांद्यांचा तुटवडा निर्माण होऊन भाव अधिक भडकण्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे. देशातील सर्वात मोठी कांद्याची घाऊक मंडई लासलगाव येथे मागील दहा दिवसात कांद्याच्या दरात तब्बल १५७ टक्के म्हणजे दीडपट वाढ झाली आहे. राष्ट्रीय बागायती संशोधन आणि विकास संस्थेच्या माहितीनुसार गेल्या बुधवारी लासलगावमध्ये कांद्याचा प्रतिक्िंवटल दर २१५१ रुपये होता. त्याआधी म्हणजे ८ ऑक्टोबर रोजी याच बाजारात कांद्याचा दर प्रतिक्िंवटल ८४० रुपये होता. या काळात येथे कांद्याचा किमान भाव ३०१ रुपये आणि कमाल भाव १०६६ रुपये नोंदला गेला होता. लासलगाव बाजारातील कांद्याचा दर संपूर्ण देशातील बाजारांसाठी मार्गदर्शक दर मानला जातो. ८ ऑक्टोबर रोजी या बाजारात कांद्याला प्रतिकिलो ८.४० रुपये दर दिला जात होता, तो १० ऑक्टोबर रोजी १०.५० रुपये किलोपर्यंत वाढला. १५ ऑक्टोबर रोजी तो १८.५८ रुपये किलोपर्यंत वाढला आणि १७ ऑक्टोबर रोजी २१.५० रुपये किलोपर्यंत वाढला. घाऊक बाजारातील कांद्याच्या या दरवाढीचा परिणाम लवकरच किरकोळ बाजारात दिसून येईल. राज्यात पावसाने दगा दिल्यामुळे कांद्याचे पीक सुकू लागले आहे. दरवर्षी नवरात्रीच्या सुमारास पाऊस पडत असतो, पण यंदा तो न पडल्यामुळे शेतात कांदा वाळला आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणे स्वाभाविक आहे.कांद्याचा दर वाढणे अपरिहार्य आहे. लासलगावात आता कांद्याचा दर चढत असताना आवक देखील घटू लागली आहे. बुधवारी येथे ५ हजार क्िंवटल कांदा आला होता. त्यापूर्वी दररोज १२ हजार टन कांद्याची आवक होत होती. भाव वाढू लागल्यामुळे छोटे शेतकरी आणि व्यापारी कांदा रोखून धरू लागले आहेत. दिवाळीला लासलगाव बाजार एक आठवडा बंद असतो. त्यावेळी कांद्याचा दर प्रतिक्िंवटल ४ हजार रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.