शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी द्या - प्रकाश आंबेडकर

Anonymous

अकोला - राफेल विमानांच्या व्यवहारातून अंबानींच्या रिलायन्सला ३६ हजार कोटी रुपयांचा फायदा करून देता. मग देशभरातील शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी द्यायला काय हरकत आहे? असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. 

अकोला येथे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांसाठी ५० हजार कोटी द्या आणि हमीभाव द्यायला कृषी उत्पन्न समित्यांना भाग पाडा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. सत्ता द्या, शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा करू, असेही ते म्हणाले.

हमीभाव मिळणार कसा ? -
भाव वाढीसाठी जून आणि जुलै महिन्यात आंदोलने झाल्यावर सरकारकडून हमीभावाची घोषणा झाली. पण हमीभाव मिळणार कसा ? व्यापारी हमीभावात खरेदी करीत नाही ही वस्तुस्थिती आहे. याची अंमलबजावणी कशी आणि कोण करणार? असा प्रश्न विचारायला एकही नेता तयार नाही, असे आंबेडकर म्हणाले. हमीभावासाठी देशभरातल्या बाजार समितीच्या अध्यक्षांना जबाबदार धरले पाहिजे. बाजार समित्यांच जर हमीभावाप्रमाणे खरेदी करणार नसतील तर शेतकऱ्यांना भाव कसा मिळेल? त्यामुळे हमीभाव न देणाऱ्या बाजार समिती अध्यक्षांवर ३०२ चा गुन्हा दाखल करा. पोटात दुखतंय आणि इंजेक्शन डोक्यात असा या सरकारचा कारभार असल्याची टीका त्यांनी केली.

तर मताचा अधिकार वापरा -
२०१९ च्या निवडणुका येत आहेत. देशामध्ये एक परिवर्तन आम्ही १९५० साली घडवलं. मानवतेची व्यवस्था प्रस्थापित केली. आज त्याच मानवतेच्या व्यवस्थेला सुरुंग लागण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले. ही परिस्थिती तुम्ही किती गांभीर्याने घेता हे निवडणुकीत कळेल. मानवतेची हि व्यवस्था राहील की न राहील, हे २०१९ ची निवडणूक ठरवणार आहे. तुम्हाला लढायचे असेल तर मताचा अधिकार वापरा. त्या मार्गाने लढा. त्या माध्यमातून तुम्ही सध्याचे सरकार घालवू शकता, असेही त्यांनी सांगितले. जे शास्त्र हातात आहे, ते वापरायचं नाही, भलत्याच शस्त्राकडे बोट दाखवायचं हि पद्धत बंद करा, असा सल्लाही त्यांनी दिला.