Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

टीबी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे निलंबन योग्यच - आय. ए. कुंदन

मुंबई - पालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी नर्स, आयांकडून चांगली वागणूक मिळत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारीत किती तथ्य आहे हे रुग्णालयात केलेल्या सरप्राईज पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे बेशिस्त परिचारिकांना निलंबित करण्यात आले आहे. पालिका रुग्णालये गोरगरिब रुग्णांसाठी आहे, युनियनसाठी नाही असे म्हणत रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबन कारवाई योग्यच असल्याचे अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सांगितले. टीबी रुग्णालयातील नर्सना निलंबन केल्याचे पडसाद पालिका सभागृहात उमटले. यावेळी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सरप्राईज व्हिजिटचा अनुभव कथन केल्यानंतर अवघे सभागृह अवाक झाले. नर्सची बाजू घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचीही गोची झाली. 

शिवडीतील क्षय रुग्णालयातल्या तीन परिचारिकांच्या निलंबनाच्या कारवाईचे पडसाद गुरुवारी पालिका सभागृहात उमटले. याबाबत शिवसेनेच्या श्रद्धा जाधव य़ांनी हरकतीचा मुद्दा मांडून निलंबन मागे घ्यावे अशी मागणी केली. मात्र विरोधी पक्षांनी याला जोरदार विरोध करून परिचारिकांवर केलेली कारवाई कशी योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. यावरून सत्ताधारी शिवसेना - विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी यावर अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्टीकरण करावे अशी मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी केलेल्या स्पष्टीकरणाने शिवसेनेच्या हरकतीच्या मुद्दयातील हवाच काढून घेतली. पालिका रुग्णालये ही गोरगरिब रुग्णांसाठी आहेत ती युनियनसाठी नाहीत असे सांगत तेथील परिचारिकांचे निलंबन का करावे लागले.. सरप्राईज पाहणीत काय घडले.. याचा धक्कादायक अनुभव त्यांनी कथन केला. त्या म्हणाल्या, या रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी माझ्य़ाकडे आल्या. यांमध्ये लोकप्रतिनिधी, नागरिक तसेच रग्णांच्या नातेवाईकांच्याही तक्रारी माझ्याकडे आल्या. त्यानंतर सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी अतिरिक्त आयुक्त नाही, तर सामाजिक कार्यकर्त्या असल्याचे सांगून रुग्णालयाच्या प्रत्येक विंगमध्ये सरप्राईज व्हिजीट केली. त्यात बी- विंगमध्ये नर्सची वागणूक चांगली वाटली. मात्र पुढच्या विंगमध्ये गेल्यावर तिथे थेट प्रवेश मिळाला. तेथे सुरक्षा रक्षक व नर्सच्या गप्पा रंगल्या होत्या. पुढे लहान मुलांच्या वॉर्डात गेल्यावर तर धक्कादाय़क प्रकार समोर आला. तिथे एका लहान मुलाच्या नाकातून रक्त पडत होते...अंगावर रक्ताचे डाग होते. तो कण्हत होता. मुलाकडे लक्ष द्या, अशी विनवणी त्याचे नातेवाईक करीत होते. मात्र तिथे नर्स, वॉर्डबॅाय गप्पात रंगले होते. कुणाचेच लक्ष नव्हते. त्या वॉर्डामध्ये प्रचंड कचरा साचल्यामुळे अस्वच्छता होती. पालिकेच्या रुग्णालयाची ही अवस्था पाहून मी भावूक झाले. मात्र काही वेळाने आपण अतिरिक्त आयुक्त असल्याचे कळल्यावर चूक झाली, असे सांगत नर्सकडून विनवणी करण्यात आली. पालिकेची रुग्णालये ही गरिबांसाठी आहे. त्यांना सोय मिळालीच पाहिजे. गरिबांच्या मुलांना अशी ट्रिटमेंट देणार ... आणि आपण आयुक्त असल्याचे समजल्यावर गयावया करीत रिस्पेक्ट देणार... हे कसे विरोधाभास आहे....इतकच नाही तर नर्सची डॅाक्टरांमध्येही दहशत असल्याची स्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नर्सकडून नातेवाईक, रुग्णांना अत्यंत वाईट वागणूक मिळते, ही परिस्थिती मी स्वतः अनुभवल्यामुळे तातडीने या परिचारिकांचे निलंबन केले. रुग्णालय गोरगरिब रुग्णांसाठी आहे, ती युनियनसाठी नाही. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही चौकशी एकतर्फी नसल्याचेही कुंदन यांनी सभागृहात स्पष्ट केले.

पालिका रुग्णालयांत गोरगरिब रुग्णांना चांगल्या सेवा मिळाल्याच पाहिजे. चुकीचे प्रकार घडत असतील तर नर्ससह डॉक्टरांचीही चौकशी करून अहवाल सभागृहाला सादर करावा व संबंधित दोषींवर कारवाई करा.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई 

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom