चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी योग्य त्या सुविधा द्या - डॉ. जगदीश पाटील

Anonymous
मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सर्व सोयीसुविधा द्याव्यात. तसेच नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सौहार्दपूर्ण व सौजन्याची वागणूक द्यावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी आज येथे दिल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबतच्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी मुंबई शहरचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखरे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, महेंद्र साळवे यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, एसटी महामंडळ, पोलीस दल, तटरक्षक दल, उत्पादन शुल्क विभाग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

चैत्यभूमी व शिवाजी पार्क येथे विविध विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांच्या नियोजनाबाबत आढावा घेताना पाटील म्हणाले, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरासह इतर ठिकाणीही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना इच्छितस्थळी जाण्यासाठी बेस्ट, एसटी महामंडळ व रेल्वेने योग्य प्रकारे नियोजन करावे. या काळात समुद्रात भरती व आहोटीच्या वेळी कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी आपत्कालीन विभागाने योग्य ती दक्षता घेऊन आवश्यक तेथे मनुष्यबळ तयार ठेवावे. चैत्यभूमी व इतर परिसरात 6 डिसेंबर रोजी दारुबंदी करून त्याची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यात यावी.

यावेळी कांबळे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या अनुयायांना कोणकोणत्या सुविधा द्याव्यात, यासंबंधी सूचना केल्या. मुंबई व परिसरातून येणाऱ्यांसाठी अतिरिक्त लोकल गाड्या तसेच एसटी महामंडळाच्या गाड्या पुरविण्यात याव्यात, पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त ठेवावा, नागरिकांना माहिती होण्यासाठी आवश्यक तेथे माहितीचे फलक व दिशादर्शक फलक लावण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.