उद्याच्‍या इतिहासाचे पत्रकार खरे साक्षीदार - उद्धव ठाकरे

Anonymous

मुंबई - पत्रकार म्‍हणून काम करीत असताना वर्तमानामध्‍ये घडणाऱया विविध घटना, प्रसंग यांची पत्रकार मंडळी नोंद घेऊन प्रसिध्‍दी देत असून एकअर्थाने ते उद्याच्‍या इतिहासाचे खरे साक्षीदार असल्‍याचे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्‍मुंबई महापालिका वार्ताहर संघाच्‍या नूतनीकरण केलेल्‍या पत्रकार कक्षाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते आज (दि.२० नोव्‍हेंबर २०१८) महापालिका मुख्यालयाच्‍या नविन इमारतीमधील तळमजल्‍यावर आयोजित कार्यक्रमात करण्‍यात आले, त्‍यावेळी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलताना पुढे म्‍हणाले की, ही वास्‍तु बघितल्‍यानंतर कुठल्‍या खासगी (कॉर्पोरेट) कार्यालयात आल्‍याचा भास होत असून पत्रकार संघाच्‍या नूतनीकरणासाठी हातभार लावणाऱया सर्वांना धन्‍यवाद देत असल्‍याचे ते म्‍हणाले.नगरसेवक अहोरात्र काम करित असल्‍यानेच मुंबईकर नागरिकांनी आमच्‍यावर २५ वर्षापासून विश्‍वास टाकला असून मुंबईकरांच्‍या विश्‍वासाला यापुढेही तडा जाणार नाही असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.तसेच जुन्‍या मुंबईचे फोटो व आताच्‍या मुंबईचे फोटो वेबसाईटवर टाकावे म्‍हणजे मुंबईकरांना चांगले काम बघता येईल, अशी सूचनाही त्‍यांनी यावेळी केली. त्‍याचप्रमाणे पत्रकार कल्‍याण निधीच्‍या कामाला गती देण्‍याची सूचना महापालिका आयुक्‍तांना त्‍यांनी यावेळी केली. मुंबई ही आपल्‍या सर्वांची असून मुंबईच्‍या चांगल्‍या कामाबद्दल चांगले लिहा अशी कोपरखळी त्‍यांनी उपस्थित प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींना शेवटी मारुन नुतन वास्‍तुच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या.

महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असून तो मजबूत असणे आवश्‍यक असल्‍याने लोकशाहीला मारक ठरणाऱया गोष्‍टींबाबत प्रबोधन करण्‍याचे काम पत्रकारांनी करण्‍याची सूचना त्‍यांनी यावेळी केली. तसेच वास्‍तववादी व सकारात्‍मक बातम्‍या पत्रकारांनी देऊन चौथा स्‍तंभ आणखी मजबूत करण्‍याची सूचना त्‍यांनी यावेळी केली. नूतनीकरण केलेल्‍या पत्रकार संघाची वास्‍तु अतिशय देखणी झाली असून उपस्थित पत्रकारांना त्‍यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, प्रशासनामध्ये पारदर्शक कारभार असणे आवश्‍यक असून यामध्‍ये पत्रकारांची भूमिका सुध्‍दा तेवढीच महत्‍वपूर्ण असल्‍याचे ते म्‍हणाले. पत्रकारांना पारदर्शक पध्‍दतीने काम करण्‍यासाठी महापालिकेने सोयी सुविधेने युक्‍त असा अत्‍याधुनिक पत्रकार कक्ष उभारला असून या कक्षाची यापुढील काळात पत्रकारांनी चांगली देखभाल करण्‍याची सूचनाही त्‍यांनी यावेळी केली. उपस्थित पत्रकारांना त्‍यांनी शेवटी शुभेच्‍छा दिल्‍या.

महापालिका वार्ताहर संघाचे अध्‍यक्ष विष्‍णु सोनवणे यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, सर्व मान्‍यवरांनी उपस्थित राहून अमूल्‍य असा वेळ दिल्‍याबद्दल त्‍यांनी सर्वांना धन्‍यवाद दिले. महापालिका आयुक्‍तांकडे मांडण्‍यात आलेल्‍या सर्व मागण्‍या पूर्ण करण्‍यात आल्‍या असून बाळासाहेब ठाकरे पालिका पत्रकार कल्‍याण निधीच्‍या कामाला गती घावी तसेच पत्रकारांसाठी मुंबईत हक्‍काचे घर मिळण्‍यासाठी सहकार्य करण्‍याची सूचना त्‍यांनी शेवटी केली.

प्रारंभी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्‍या हस्‍ते फित कापून नूतनीकरण केलेल्‍या पत्रकार कक्षाचे उद्घाटन करण्‍यात आले. त्‍यानंतर मान्‍यवरांनी अद्यावत कक्षाची पाहणी करुन सोयीसुविधेबद्दल समाधान व्‍यक्‍त केले.‍ कार्यक्रमाचे खुमासदार संचालन मनश्री पाठक यांनी तर आभारप्रदर्शन श्रीरंग सुर्वे यांनी केले.
Tags