१४ महापालिका सफाई कर्मचारी निलंबित

Anonymous
मुंबई - बृहन्मुंबई महापालिकेच्या 'ए' विभागातील नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) परिसरात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणा-या व कर्तव्यात कसूर करणा-या १४ महापालिका कर्मचा-यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या कामगारांशी संबंधित २ पर्यवेक्षक व एका सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकास 'कारणे दाखवा नोटीस'ही बजावण्यात आली आहे, अशी माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. 
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील 'ए' विभागात फोर्ट, कुलाबा, कफ परेड, चर्चगेट यासह 'नेताजी सुभाष मार्गाच्या (मरीन ड्राईव्ह) काही भागाचा समावेश होतो. याच 'मरिन ड्राईव्ह' परिसरातील साफसफाई योग्य प्रकारे होत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परिसरात कर्तव्यावर असणा-या कामगारांची व त्यांच्या कामांची 'अचानक तपासणी' करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते. या आदेशांनुसार 'मरिन ड्राईव्ह' परिसरातील साफसफाई बाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांद्वारे 'अचानक तपासणी' शुक्रवारी करण्यात आली. या तपासणी दरम्यान कर्तव्यावर असणे अपेक्षित असलेले १३ कामगार हे 'बायोमेट्रीक हजेरी' नोंदवून पसार झाल्याचे आढळून आले. यानंतर सदर १३ कामगारांसह एका मुकादमावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Tags