मुंबई महापालिका सफाई कामगारांचे आंदोलन मागे

Anonymous
मुंबई - मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला फायदा करून देण्यासाठी आपल्या कामगारांना डावलले होते. त्याविरोधात १३ नोवेंबरपासून पश्चिम उपनगरातील काही वॉर्डमध्ये काम बंद आंदोलन सुरु होते. शुक्रवारी हे आंदोलन मुंबईभर सुरु झाल्याने शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता. आज या कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानात मॉररचाही काढला होता. त्यानंतर मिळालेल्या आश्वासनानंतर कामबंद आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे समन्वय़ समितीने जाहिर केले. 

मुंबई महापालिकेने 13 नोव्हेंबरपासून कांदिवली, बोरिवली, दहिसर व मुलुंड या चार विभागातील कचरा वाहनात भरणे व तो वाहून नेऊन त्याची विल्हेवाट डंपिंग ग्राऊंड पर्यंत लावण्याचे काम पालिकेने कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे संबंधित तिन्हीही विभागातील मोटर लोडिंग करणा-या नियमित कामगारांना दुस-या विभागात कामासाठी पाठवले आहे. हे कंत्राट फक्त चार विभागापुरते मर्यादित नसून टप्प्या- टप्प्याने सर्व 24 विभागात सुरु केले जाणार आहे. त्यामुळे सद्या काम करीत असलेल्या 5500 मोटर लोडर कामगारांचे काम कायमस्वरुपी संपुष्टात येणार आहे. कंत्राटदाराला काम देण्यासाठी या निर्णयामुऴे गेल्या 12 वर्षापासून काम करीत असलेल्या 7000 कंत्राटी कामगारांच्या नोकरीवर गदा य़ेणार आहे. प्रशासनाच्या या एकतर्फी निर्णयाविरोधात शेकडो कामगारांनी मागील चार दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले होते. शुक्रवारी संपूर्ण मुंबईत कामबंद आंदोलन सुरू केल्याने मुंबईत जागोजागी कच-याचे ढिग साचले आहेत. आंदोलन चिघळल्याचे लक्षात आल्यावर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेतली. शुक्रवारी सायंकाळी उपायुक्त विश्वास शंकरवार व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव व समन्वय़ समितीच्या प्रतिनिधींची महापालिकेच्या मुख्य कार्यालयात संयुक्त बैठक झाली. या बैठकीत कंत्राटी पद्धतीने कचरा भरणे व वाहून नेण्याचे काम पालिका कामगारांकडून केले जाईल, मोटर लोडिंग कामगारांना दुस-या विभागात बदली करण्यात येऊ नये, मार्च 2018 पर्यंत काम करीत असलेल्या कंत्राटी कामगारांना पूर्ववत काम देण्यात येईल असे सकारात्मक आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन मागे घेतल्याची माहिती समन्वय समितीने दिली. बैठकीला बाबा कदम,. महाबळ शेट्टी, सत्यवान जावकर, के. पी. नाईक, सुखदेव काशिद उपस्थित होते. हे आंदोलन तूर्तास मागे घेत असून शनिवारपासून बंद असलेले काम पुन्हा सुरु केले जाईल.

पालिका कर्मचा-यांच्या आंदोलनानंतर संबंधित विभागात कामगारांना काम दिले जाणार आहे. त्यासाठी किती कामगार आहेत, किती कामगारांचे समायोजन केले जाणार, कामगारांवर किती परिणाम होणार आहे. याबाबतचा आढावा घेऊन तयार केलेला अहवाल येत्या मंगळवारी उपायुक्त विश्वास शंकरवार स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे सादर करणार आहेत. या अहवालानुसार निर्णय घेतला जाणार आहे. बुधवारी तसे लेखी आश्वासन समन्वय समितीला दिले जाणार असल्याचे समितीचे अशोक जाधव, बाबा कदम यांनी सांगितले.
Tags