महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर गृह सचिवांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

Anonymous
मुंबई, दि. 16 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 62 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षा तसेच इतर सोयी सुविधांचा आढावा आज गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी घेतला. तसेच या काळात नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 6 डिसेंबर रोजी राज्यभरातून नागरिक येत असतात. त्या काळातील सुरक्षा व्यवस्था व इतर सोयी सुविधांची आढावा बैठक आज मंत्रालयात पोरवाल यांनी घेतली. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, अतिरिक्त महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमवीर सिंह, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, लोहमार्ग पोलीस आयुक्त निकेत कौशिक, मुंबई शहरचे निवासी उपजिल्हाधिकारी सामपाल डावखर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त ए. जी. खैरनार यांच्यासह बेस्ट, रेल्वे विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क व चैत्यभूमी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोयीसुविधा पुरविण्यात येतात. शौचालयांची व्यवस्था,पाणी, मंडप तसेच शिवाजी पार्क येथे नियंत्रण कक्ष आदी सुविधा करण्यात येणार आहेत. तसेच यंदा महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या काळात राज्यभरातून येणाऱ्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जावी, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव पोरवाल यांनी यावेळी दिले.