Type Here to Get Search Results !

पुलगाव स्फोट - मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य

मुंबई दि. 20 - वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा भांडारात जुने बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले असून या स्फोटात गंभीररित्या जखमी झालेल्यांना प्रत्येकी 2 लाख तर किरकोळ जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे अशी माहिती अर्थमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तातडीने भेट घेत चर्चा केली. या चर्चेदरम्यान मृतकांच्या कुटुंबियांना व जखमींना वरीलप्रमाणे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी एक समिती गठित करावी व समितीने एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा असे निर्देशही देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व आयुध निर्माण कारखान्यांच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षेसंबंधीच्या सर्व व्यवस्थांचा अभ्यास करून प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आपण स्वत: संरक्षणमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्याशी या घटनेसंदर्भात चर्चा केली असून केंद्रीय स्तरावरूनही मदत देण्याबाबतची विनंती केली आहे असेही ते म्हणाले.

Top Post Ad

Below Post Ad