लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सूचना

Anonymous

मुंबई - वाढत्या गर्दीचा लोकलवर पडणारा ताण लक्षात घेता उपनगरीय लोकल गाड्या १५ डब्यांच्या करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गोयल यांची बैठक झाली. या बैठकीत गोयल यांनी हे आदेश दिले आहेत. यासाठी येत्या दोन आठवड्यात योजनाबद्ध आराखडा सादर करण्याचे आदेशही मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गोयल यांनी दिले. या निर्णयामुळे मुंबई उपनगरीय लोकल गाड्यांची क्षमता २५ टक्क्यांनी वाढणार आहे.

पश्चिम रेल्वेवरील १२ डब्यांच्या गाड्यांची क्षमता तीन हजार प्रवासी वाहून नेण्याची आहे. पण गर्दीच्या वेळी सुमारे साडेपाच हजार प्रवासी एका गाडीतून प्रवास करतात. तर १५ डब्यांच्या गाड्यांची प्रवासी वाहन क्षमता ही ४, २०० इतकी आहे. पण या गाड्यांमधून सुमारे ७ हजार प्रवासी गर्दीच्या वेळी प्रवास करतात. सध्या पश्चिम रेल्वेकडे सध्या फक्त ५ लोकल गाड्या १५ डब्यांच्या आहेत. या १५ डब्यांच्या गाड्यांच्या दिवसातू ५४ फेऱ्या होतात. तर मध्य रेल्वेकडे फक्त एकच लोकल १५ डब्यांची आहे. मध्य आणि पश्मिच रेल्वेच्या जलद मार्गावर या १५ डब्यांच्या लोकल सुरुवातीला धावतील. यानंतर धीम्या मार्गावरही १५ डब्यांच्या लोकल सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
Tags