सेव्हन हिल्स रुग्णालयाचा करार रद्द करण्याची मागणी सभागृहात मंजूर

Anonymous

मुंबई - मरोळ येथे पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या सेव्हन हिल्स रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबरोवर केलेला करार रद्द करावा अशी शिवसेनेने सभागृहात केलेल्या मागणीला मंजुरी देण्यात आली.

करारातील अटी शर्तींचा भंग करुन गरीबांना सेवासुविधा नाकारणा-या व्यवस्थापनाला धडा शिकवण्यासाठी या कराराचा फेरविचार करण्याची मागणी शिवसेना नगरसेविका राजुल पटेल यांनी केली. सर्वपक्षीय सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर सभागृहाने ही सूचना मंजूर केली. 

मरोळ येथे रुग्णालयासाठी राखीव असलेल्या ७७, ०५५ चौ. मीटर भूखंडापैकी २६ हजार ९९० चौ. मी. भूखंडावर हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र सुरूवातीपासूनच हे रुग्णालय वादात सापडले होते. गरीब रुग्णांना माफक दरात उपचार देणे व त्यांच्यासाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवण्याच्या अटीवर ही जागा रुग्णालयाला देण्यात आली होती. मात्र या अटी शर्तींचे संस्थेने नेहमीच उल्लंघन केले आहे तसेच संस्थेकडे पालिकेची कोट्यावधींची थकबाकी असल्यामुळे हा करार रद्द करावा अशी सूचना राजुल पटेल यांनी केली. तसेच टाटा संस्थेबरोबर करार करावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली. संस्थेच्या या मनमानीकडे प्रशासन गांभीर्याने बघत नसल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी यावेळी केला. प्रशासनाने जर या रुग्णालयाबाबत दुस-या संस्थेशी परस्पर करार केला असेल तर ते योग्य नसून त्याबाबतचा प्रस्तावही सुधार समितीमध्ये तसेच सभागृहात आला पाहिजे अशा मागणी जाधव यांनी केली.

प्रशासनाने केला परस्पर करार? - शिवसेनेच्या या मागणीला विरोधी पक्षनेते रवी राजा यांनीही पाठिंबा दिला. मात्र प्रशासनाने आधीच परस्पर युएई या कंपनीशी करार केला असल्याची माहिती सभागृहाला दिली. प्रशासनाने सभागृहाच्या अधिकारांवर गदा आणू नये असाही इशारा रवी राजा यांनी यावेळी दिला.
Tags