अंधेरी आगप्रकरणी दोघांची जामिनावर सुटका


मुंबई -अंधेरीतील कर्मचारी राज्य बिमा निगम (ईएसआयसी) रुग्णालयाला लागलेल्या आगप्रकरणी बुधवारी अटक केलेल्या सुप्रिम कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीचे साईट अभियंता निलेश मेहता आणि साईट सुपरवायझर निलेश कांबळे या दोघांना गुरुवारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या दोघांनाही न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर त्यांची प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आठ विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने बुधवारी चौघांविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच रात्री उशिरा सुप्रिम कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीचे साईट अभियंता निलेश मेहता आणि साईट सुपरवायझर निलेश कांबळे यांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांनाही गुरुवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले होते, त्यानंतर त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता.

या अर्जावर सुनावणी होऊन या दोघांनाही सायंकाळी प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या जामिनावर सोडून देण्यात आले. या आगीला तिथे उपस्थित असलेले दोन वेल्डर जबाबदार असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या दोघांचा आता पोलिसांकडून शोध सुरु आहे. लवकरच रुग्णालय प्रशासन अधिकार्‍यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. दोषी अधिकार्‍यांवर चौकशीनंतर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले.
Previous Post Next Post