'बेस्ट' सदस्यांच्या विरोधानंतरही तिसऱ्यांदा कागदी तिकीटांची छपाई

Anonymous

मुंबई - ट्रायमॅक्स मशीन नादुरुस्त झाल्याने कागदी तिकीट छपाईच्या प्रस्तावास बेस्ट समिती सदस्यांनी विरोध केला होता. मात्र प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी अखेर महाव्यवस्थापकांनी आपल्या अधिकाराचा वापर करत बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सदस्यांच्या विरोधाला न जुमानता अखेर ४७ लाखांची कागदी तिकीटांची छपाई केली आहे. बेस्ट समिती सदस्यांनी विरोध करूनही बेस्ट महाव्यवस्थापकानी ही अशा प्रकारची खरेदी सलग तिसऱ्यांदा केली आहे. 

ट्रायमॅक्स मशीन नादुरुस्त झाल्याने बेस्ट बसेस मध्ये पुन्हा एकदा प्रवाशांना कागदी तिकीट देण्यास सुरू झाली. मात्र कागदी तिकीटांचा पुरेसा साठा बेस्टकडे उपलब्ध नव्हता . दरम्यान कागदी तिकीट छापण्यासाठी बेस्ट समितीची परवानगी घेणे आवश्यक आहे. ह्यापूर्वी १ फेब्रुवारी २०१८ ला झालेल्या समितीत तिकीट छपाईचा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यानंतर एकदा मागील बैठकीत झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत कागदी तिकीट छापण्यासाठी प्रस्ताव आणला होता. मात्र बेस्ट प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ त्या वेळेस हा प्रस्ताव बेस्ट समिती सदस्यांनी नामंजूर केला. यामुळे भविष्यात कागदी तिकीटांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती. हे लक्षात घेता त्या वेळेसही बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सदस्यांच्या विरोधाला न जुमानता कागदी तिकीटांची छपाई केली. 

लक्ष्मी विलासम प्रेस या कंपनीला तिकीट छपाईचे १ कोटी ७१ लाख ३६ हजार रुपयांचे कंत्राट देण्यासाठी सदर प्रस्ताव बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आला होता मात्र बेस्ट समितीने हा प्रस्ताव फेटाळल्याने महाव्यवस्थापकांनी स्वतःच्या अधिकारात प्रत्येक वेळी ४७ लाखांची कागदी तिकीटांची छपाई सलग तिसऱ्यांदा केली आहे. 

बेस्ट समिती सदस्य व प्रशासन यांच्यातील वादामुळे अखेर ट्रायमॅक्स मशीनचा करार रद्द झाला आणि ३० जूनपासून कागदी तिकीटांचा पयाॅय प्रशासनाने पुन्हा एकदा अंमलात आणण्याचा निणॅय घेतला. प्रशासनाच्या या निणॅयामुळे बस वाहकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी व्यक्त केली. त्यातच आता कागदी तिकीटांचा तुटवडा निर्माण झाल्याने बेस्ट प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहिले होते. मात्र पुढिल दोन महिने तरी बेस्ट कारभार सुरळीत राहणार आहे .

अजून एक प्रस्ताव तयार
ह्या बस तिकीट येत्या दोन ते तीन महिन्यात संपतील त्यानंतर कोणतीही गैरसोयी होऊ नये म्हणून आणखी ४७ लाखांचा अजून एक प्रस्ताव तयार असल्याचे बेस्ट अधिकाऱ्यांकडूनकडून सांगण्यात आले .
Tags